विधायक : दिव्यांग आजीबाईला मिळाला वाॅकर स्टॅण्ड; बेरोजगार दिव्यांग संघर्ष समीतीचा पुढाकार 

प्रल्हाद कांबळे | Sunday, 17 January 2021

दिव्यांग आजीबाईने प्रसन्नेतुन मानले बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीच्या शिष्टमंडळाचे अश्रुरुपी आभार

नांदेड : बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर एका वयोवृद्ध दिव्यांग आजीबाईची तुटकी खुडची घेऊन ये- जा करतांनाची पोस्ट व्हायरल झाली होती. परंतु प्रत्यक्षात त्या आजीबाईंसाठी कोणाकडूनच मदतीचा पाझर फुटला नव्हता. तेंव्हा सतीश पाटील हिवराळे यांनी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या आजवरच्या विविध सामाजिक कार्याचा आढावा घेत थेट फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत सदरील गोरगरीब दिव्यांग आजीबाईविषयी कळविले. आणि ज्याप्रमाणे आपण ईतर सर्व शेकडो दिव्यांगांना न्याय हक्क मिळवून देता त्याचप्रमाणे या दिव्यांग आजीबाईंना सुद्धा मदत करावी अशी विनंती केली होती.

राहुल साळवे यांनी सतीश पाटील हिवराळे यांच्या शब्दाचा मान ठेवत मुखेड येथील तालुका अध्यक्ष देविदास ऊर्फ पिंटुदादा बद्देवाड यांना सदरील दिव्यांग आजीबाईंबाबत कळविले असता देविदास बद्देवाड यांनी कुठलीच दिरंगाई न करता वाॅकर स्टॅण्ड घेऊन ठेवले आणि मकर संक्रांतीचे औचीत्य साधत ता. 14 जानेवारी रोजी राहुल साळवे यांच्यासह परमेश्वर शेटवाड, राजकुमार देवकर आणि कार्तिक भरतीपुरम यांना आपल्या वाहनाद्वारे स्वखर्चाने तुपदाळ खुर्द तालुका मुखेड गाठले. त्या गावी जाताच सतीश पाटील हिवराळे यांनी शब्दाचा मान ठेवत आलेल्या सर्व दिव्यांग शिष्टमंडळाचे स्वागत केले.

हेही वाचा नांदेड येथे आज होणाऱ्या पतंग महोत्सवासाठी स्पर्धक तयार

Advertising
Advertising

दिव्यांग आजीबाईं गिरीजाबाई तुळशिराम पिठलेवाड यांना सर्व गावकऱ्यांसमवेत आणलेले वाॅकर स्टॅण्ड दिले. तत्पुर्वी राहुल साळवे यांच्यासह आलेल्या देविदास बद्देवाड, परमेश्वर शेटवाड, कार्तिक भरतीपुरम आणि राजकुमार देवकर यांनी दिव्यांग आजीबाईंना तिळगुळ देऊन चरणस्पर्श आशिर्वाद घेतला. यावेळी आजीबाई भारावून गेल्या होत्या. त्यांना आनंदाश्रु अनावर झाले होते. त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि दिलेले वाॅकर स्टॅण्ड घेऊन थेट आपल्या घराकडे आनंदात धावली. या उल्लेखनीय कार्याबद्दल डाॅ.सचिन पाटील बोडके आणि सतीश पाटील हिवराळे यांच्यासह सर्व गावकऱ्यांनी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाचे कौतुक करत आभार मानले.