दिवाळी विशेष : केरसुनी बनविणाऱ्या कारागिरांचे हात लक्ष्मीविनाच

प्रल्हाद कांबळे
Saturday, 14 November 2020

केरसुनी करणारे शेकडो पारंपारिक व्यवसाय आता राम राहिला नाही असे म्हणत आहेत. मात्र अंगवळणी पडलेला हा व्यवसाय असल्याने कमी फायद्यात असूनही केरसुनी बनविण्याचे काम सुरु आहे.

नांदेड : स्वच्छ आणि प्रसन्न असलेल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य असते अशी श्रद्धा असल्याने दिवाळी सणात आपल्याकडे केरसुनी अर्थात झाडूची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला झाडूची खरेदी करुन लक्ष्मीपूजनाला रीतसर झाडूची पूजा केली जाते. मात्र यंदा केरसुनी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या भावात मोठी वाढ झाली. त्यामुळे केरसुनी बनविणारे हात मात्र लक्ष्मीविना राहत आहे. केरसुनी करणारे शेकडो पारंपारिक व्यवसाय आता राम राहिला नाही असे म्हणत आहेत. मात्र अंगवळणी पडलेला हा व्यवसाय असल्याने कमी फायद्यात असूनही केरसुनी बनविण्याचे काम सुरु आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात पार्डी (म) येथील दहा ते पंधरा कुटुंब केरसुनी बनविण्याचे काम करीत आहेत. हे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून केरसुणी तयार करण्याच्या व्यवसायात गुंतले आहेत. मात्र दिवस-रात्र मेहनत करुन एक कुटुंब ५० ते ६० टक्के केरसुनी तयार करताता. एक केरसुनी बाजारात पंचवीस ते तीस रुपयाला मिळते. मात्र केरसुनी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य यांचे दर आकाशाला भिडले असल्याने त्यांच्या पदरात काही पडत नाही. सध्या दिवाळी सणासाठी केरसुनीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे प्रत्येक कुटुंबातील सदस्य केरसुनी बनविण्याच्या आणि बाजारात विकण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करीत आहेत. मात्र बाजारात केरसुनीला भाव मिळत नसल्याने हे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा -  नांदेड : जबरी चोरी करणारी टोळी अटक, दिड लाखाचा ऐवज जप्त -

कुटुंब पिढ्यान- पिढ्यापासून झोपडपट्टीतच पार्डी मक्ता येथील १० ते १५ कुटुंबाचा एकमेव व्यवसाय आहे. दोन ते तीन पिढ्यांपासून त्यांच्या घरात हाच व्यवसाय आहे. मात्र अनेकांच्या घराचे पत्रे बदलले नाही. पावसाळ्यात अनेकांच्या घरात पावसाचे पाणी साचते. आजही काही कुटुंब झोपडीत राहतात. 
- लक्ष्मण गजभारे, कारागीर

दिवाळीत प्रत्येक घरात केरसुनी खरेदी केला जातो. याकरिता एक कुटुंब दिवसातून ६० ते ७० केरसुनी बांधली आहेत. ती केरसुनी विकण्यासाठी नांदेड, अर्धापूर, लोहा, कंधार, वसमत, वारंगा, कळमनुरी आदी मोठ्या शहराच्या बाजारात विकण्यासाठी जात आहे. मात्र केरसुनीला बाजारात कमी दर मिळत असल्याने या व्यावसायिकांच्या पदरात काहीच पडत नाही.
- सविता गजभारे, कारागीर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Special: The hands of the artisans who make kersuni without rupees nanded news