पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीने उचलले हे पाऊल..

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 5 मे 2020

शिकारा (ता. मुखेड) येथे सोमवारी (ता. चार) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी पतीला मुखेड पोलिसांनी अटक केली आहे

नांदेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन चक्क तिचा वायरने गळा आवळून निर्घृण खून कल्याची घटना शिकारा (ता. मुखेड) येथे सोमवारी (ता. चार) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी पतीला मुखेड पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने मुखेड तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

मुखेड तालुक्यातील सोसायटी तांडा, शिकारा येथील संतोष जाधव (वय ३२) हा आपल्या परिवारासह राहतो. त्याच्या लग्नानंतर काही दिवस तो पत्नीसोबत चांगला राहू लागला. नंतरच्या काळात त्याने आपल्या पत्नी रेणूका (वय २७) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी मारहाण करणे आणि अपमान करून तिचा शारिरीक व मानसिक छळ करणे सुरु केले. पतीचा होणारा त्रास तीने आपल्या माहेरी कळविला होता. तिच्या माहेरच्या मंडळीनीही संतोष जाधव याला समजावून सांगितले होते. परंतु त्याच्या वागण्यात काही बदल झाला नाही. रोज घरी आल्यानंतर पत्नीला मारहाण करीत असे.

हेही वाचामहावितरण परिमंडळातील ‘एवढ्या’ ग्राहकांचे आॅनलाईन मीटर रिडींग 
 
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून

सोमवारी या दाम्पत्यामध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून चक्क संतोष जाधव याने रेणुका हिचा वायरने गळा आवळून निर्घृण खून केला. ही माहिती तिच्या माहेरी समजताच नातेवाईकांनी धाव घेतली. यावेळी मुखेड पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक श्री. अकुशकर यांनी घटनास्थळ गाठले. महिलेचा मृतदेह मुखेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केला. रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. 

आरोपीला केले अटक

या प्रकरणी रामराव बळीराम राठोड रा. गोजेगाव (ता. मुखेड) यांच्या फिर्यादीवरुन पती संतोष रामराव जाधव आणि त्याचा भाऊ अनिल रामराज जाधव यांच्याविरुद्ध संगनमताने केलेल्या खूनाचा गुन्हा मुखेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्री. अकुशकर यांनी आपल्या हातात तपास घेताच रात्रीच संतोष जाधव याला अटक केली आहे. 

येथे क्लिक करा - स्नेहनगर पोलीस वसाहतीचा विकास करणार- आ. कल्याणकर

कोयत्याने फोडले डोके

मुखेड :  पैसे देण्याच्या कारणावरून एकाने संगनमत करुन सख्खा नातेवाईक असलेल्या लक्ष्मण गंगाधर कऱ्हाळे याच्या डोक्यात कोयत्याने मारुन गंभीर जखमी केले. ही घटना डबडे शिरुर (ता. मुखेड) शिवारात रविवारी (ता. तीन) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
 
मारेकऱ्यांनी थापडबुक्यानी मारहाण करुन डोके फोडले. तसेच लक्ष्मण कऱ्हाळे याचा नातू वाद सोडविण्यासाठी समोर आला असता त्यालाही मारहाण करुन दात पाडला. या प्रकरणी लक्ष्मण गंगाधर कऱ्हाळे यांच्या फिर्यादीवरुन मुखेड पोलिस ठाण्यात गंगाधर लक्ष्मण कऱ्हाळे, मारोती गोविंदराव गवते, अर्जून अशोक पुंडगीर आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. गारोळे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doubt on the character of the wife, this step taken by the husband nanded news