स्वारातीम विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी- उदय सावंत

श्याम जाधव
Saturday, 19 September 2020

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नांदेड : इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, परीक्षेसाठी लागणारे संदर्भ, पुस्तके, मार्गदर्शक उपलब्ध व्हावेत या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विविध विकास कामे, कोविड-19 प्रादुर्भामुळे खोळंबलेल्या परीक्षेबाबत आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज विद्यापीठात संपन्न झाली. या बैठकीस कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, प्रभारी कुलगुरु डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. वसंत भोसले, डॉ. वैजयंता पाटील, डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. महेश मगर, परीक्षा व मुल्यमापन मंडळाने संचालक डॉ. रवी सरोदे, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. नलिनी टेंबेकर यांची उपस्थिती होती.

हेही वाचा दूर्दैवी घटना : बैलगाडीसह सालगडी वाहून गेला, सुदैवाने तो वाचला मात्र...

मुलींना विद्यापीठामध्ये निवासाची सोय उपलब्ध व्हावी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या बैठकीत विचारविमर्ष करण्यात येऊन विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींना विद्यापीठामध्ये निवासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शंभर मुलींचे शासकीय वसतीगृह, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या शंभर मुलांसाठी वसतीगृह, शासकीय अध्यापक महाविद्यालयास विद्यापीठात जागा उपलब्ध करुन देणे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या इमारतीस प्रशासकीय मान्यता देणे, डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्रास मान्यता व वसतीगृह इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन देणे, श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्थेच्या नवीन विभागीय इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यताबाबत याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आग्रह धरुन त्यास मान्यता घेतली.

विद्यापीठाच्या विविध विकास कामांबाबत आढावा

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या विस्तारासाठी माझे अनुभव संपन्न व ज्येष्ठ सहकारी मंत्री अशोक चव्हाण यांच्या सूचना व मार्गदर्शनाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करीत दोन महिन्यानंतर पुन्हा विद्यापीठाच्या विविध विकास कामांबाबत आढावा बैठकीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आम्ही येऊ असे सुतोवाच केले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Swaratim University. Sanction to Shankarrao Chavan Competition Examination Center Uday Sawant nanded news