esakal | नांदेड जिल्ह्यात संततधार पावसामुळे उडीद, मुगाला फुटले मोड
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड जिल्ह्यात भीज पावसामुळे मुगाला मोड फुटले आहेत.

नांदेड जिल्ह्यात यंदा पाऊस वेळेवर पडल्यामुळे पिके चांगली आली होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे उडीद, मुगाला मोड फुटले आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत आला असून यंदाच्या वर्षी सुगी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. 

नांदेड जिल्ह्यात संततधार पावसामुळे उडीद, मुगाला फुटले मोड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड (कुरूळा, बरबडा) - शहर आणि जिल्ह्यात मागील एक आठवड्यापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मूग, उडीद काढणीच्या ऐन हंगामात व्यत्यय येत असून बऱ्यापैकी फळधारणा होऊनही सततच्या पावसामुळे मूग आणि उडीद पिकांची जाग्यावरच नासाडी होत आहे. रोजच्या रिपरिपीमुळे हाती आलेली मुग, उडदाची सुगी जाण्याची भीती आता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
 
कंधार तालुक्यातील कुरुळा महसूल मंडळात बहुतांश शेतकऱ्यांकडून आंतरपीक म्हणून मूग आणि उडदाची लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात २३२ हेक्टरवर मूग, तर १८० हेक्टरवर उडीद पिकाची लागवड करण्यात आली आहे. वर्षभर आहारात पालेभाज्याच्या शिवाय मोठ्या प्रमाणात मूग, उडीद या डाळींचा वापर होतो. परंतु मागील दोन आठवड्यापासून कुरुळा, मरशिवणी, बोळका, महालिंगी, कारतळा, हटक्याळ यासह इतर ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे हाती आलेल्या मूग आणि उडीदाच्या शेंगांना बुरशी येऊन जाग्यावरच मोड फुटत आहेत. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातून दोनशे बसेसचे नियोजन, पहिल्याच दिवशी पावसाचा अडथळा 

शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण 
हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पावसामुळे पिकांची समृद्ध वाढ झाली होती. फळधारणा होऊन शेंगाही परिपक्व झाल्या परंतु ऐन तोडणीच्या कालावधीतच पावसाचा ससेमिरा सुरू झाला. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण आहे. ता. ३१ जुलैपासून एक दोन तारखेचा अपवाद वगळता वरुणराजाने नियमित हजेरी लावली. दोन आठवड्यापासून सूर्यदर्शन झाले नसल्याने ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे कीटकनाशकांचा वापरही करता येत नाही. त्यामुळे कोवळ्या शेंगावरच अळींनी हल्ला चढवला असून पीक जोमदार येऊनही उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत
बरबडा व परिसरात मागील चार वर्षांपासून शेतकरी नेहमीच विविध संकटांना सामोरा जात आला असताना यंदाही त्याच्या हातातोंडाशी आलेला घास त्याच्याच डोळ्यांदेखत वरुणराजाने हिरावून नेला. यंदा पाऊस समाधानकारक झाला. मूग, उडीद या पिकांच्या शेंगा तोडणीला आल्या; परंतु बरबडा व परिसरात मागील आठवडा भरापासून सततच्या रिमझिम पावसाने मूग, उडीद पिकांच्या शेंगांना प्रत्यक्ष मोड (अंकुर) आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. प्रशासनाने तत्काळ पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - शेकडो गावांचा पाणीप्रश्‍न लोअर दुधना धरणामुळे मिटणार, एकावन्न टक्के पाणीसाठा जमा...  

सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे नुकसान           
जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात तालुक्यात मुक्काम ठोकला. गेला एक आठवडा सतत पाऊस पडत असल्याने मागील काही दिवसांपासून सूर्याचे दर्शन झाले नाही. परिणामी तालुक्यातील हजारो हेक्टर मधील काढणीला आलेले मुगाच्या शेंगाना मोडे फुटून जमीनदोस्त झाली आहे तर काही ठिकाणी रानडुकराच्या हैदोसामुळे मुगाचा नासाडी होत आहे. यंदा नायगाव व परिसरात सोयाबीन, मूग, उडीद पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. परंतु मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे निघाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला. परंतु दुबार पेरणी केल्यावर मूग, उडीद पिकांना बऱ्यापैकी शेंगा लागल्या व त्या तोडणीस आल्याने शेतकरी समाधानी झाला. परंतु मागील आठवडाभरापासून सततच्या रिमझिम पावसामुळे तोडणीस आलेल्या मूग, उडीद पिकांच्या शेंगांना प्रत्यक्ष मोड फुटले असल्याने शेतकरी अडचणीत आला असल्याने त्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सदर विमा कंपनी व प्रशासनाचे अधिकारी यांनी त्वरित पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी  शेतकरी करत आहेत.

 

loading image
go to top