नांदेड : कोणाला मिळणार मंत्रिपदाची संधी?

नांदेडकरांमध्ये उत्सुकता; कल्याणकर, राठोड, केराम, रातोळीकर, पवारांचे नाव चर्चेत
Maharashtra Politics
Maharashtra Politics

नांदेड : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचा गुरूवारी शपथविधी झाल्यानंतर आता या मंत्रीमंडळात नांदेड जिल्ह्यातील कोणाची वर्णी लागणार? याची चर्चा सुरू झाली असून नांदेडकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील भाजपचे चार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे एक असे पाच आमदार असून त्यापैकी कुणाला मंत्रीपदाची संधी मिळणार, याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे नऊ आमदार असून विधानपरिषदेचे दोन असे एकूण अकरा आमदार आहेत. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माधवराव पाटील जवळगावकर, मोहन हंबर्डे आणि जितेश अंतापूरकर हे कॉँग्रेसचे चार, भीमराव केराम, डॉ. तुषार राठोड आणि राजेश पवार हे भाजपचे तीन, शिवसेनेचे शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कॉँग्रेसचे अमर राजूरकर आणि भाजपचे राम पाटील रातोळीकर असे दोन विधानपरिषदेचे आमदार आहेत. या अकरा पैकी भाजपचे चार आणि शिवसेनेचे एक अशा पाच जणांपैकी कोणाची मंत्रीमंडळात वर्णी लागणार? याकडे नांदेडकरांचे आता लक्ष लागले आहे.

मुखेड मतदारसंघातून डॉ. राठोड हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. तसेच बंजारा समाजाचे असल्याने राठोड यांना संधी मिळू शकते. किनवट या आदिवासी बहुल मतदारसंघातून केराम हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. केराम हे ज्येष्ठ अनुभवी असून आदिवासी समाजातील असल्याने त्यांना संधी दिली जाऊ शकते. राजेश पवार हे नायगाव मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले आहेत. त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले राम पाटील रातोळीकर हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. या चार भाजपच्या आमदारांपैकी कोणाला मंत्रीमंडळात स्थान मिळेल? हे आत्ताच सांगणे कठीण आहे. कारण भाजपच्या वतीने वापरले जाणारे धक्कातंत्र लक्षात घेता आता काय निर्णय होईल, हे सांगणे अवघड झाले आहे.

नांदेड उत्तर मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले बालाजी कल्याणकर हे शिंदे यांच्या गटात असून सुरवातीपासून ते एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी दोनदा नांदेड महापालिकेत नगरसेवक आणि विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. त्यामुळे त्यांच्या देखील मंत्रीमंडळात प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर कल्याणकर यांचे कामही चांगले असून नशीब देखील जोरावर आहे. आत्तापर्यंतच्या राजकीय लढाईत त्यांचा क्रम चढता राहिला आहे. त्यामुळे भविष्यात मंत्रीपद किंवा पालकमंत्रीपद जर त्यांच्या वाट्याला आले तर आश्चर्य वाटायला नको? असेच म्हणावे लागेल.

खासदार चिखलीकरांचा कौलही महत्त्वाचा

जिल्ह्यात भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका आणि कौलही तितकाच महत्वाचा आहे. ते कोणत्या आमदारांच्या पारड्यात वजन टाकणार त्याच्यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.

अशोक चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष

नांदेड जिल्ह्यात सध्या कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांची भूमिका आता काय राहणार? हाही महत्वाचा प्रश्न आहे. त्यांचे सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते काय भूमिका घेणार, हे पाहणेही तितकेच महत्वाचे असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com