नांदेड : महाविकास आघाडीत माहूरमध्ये बिघाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 महाविकास आघाडीत माहूरमध्ये बिघाडी
नांदेड : महाविकास आघाडीत माहूरमध्ये बिघाडी

नांदेड : महाविकास आघाडीत माहूरमध्ये बिघाडी

नांदेड : जिल्ह्यात सोमवारी (ता. १४) झालेल्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्धापूर आणि नायगाव येथे कॉँग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे त्यांची सरशी झाली. मात्र, माहूर नगरपंचायतीत राष्ट्रवादीने कॉँग्रेसला बाजूला ठेवत शिवसेनेची साथ सोबत घेऊन नगराध्यक्षपद मिळवले. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत किनवट आणि माहूर तालुक्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येतील, अशी चिन्हे कमीच दिसून येत आहेत.

अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे छत्रपती कानोडे तर उपनगराध्यक्षपदी कॉँग्रेसच्याच यास्मिन सुलताना यांची बिनविरोध निवड झाली. अर्धापूरला काँग्रेसला तिसऱ्यांदा बहुमत मिळाल्याने काँग्रेसचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष होणार, हे निश्चित होते. निवडीचे सर्व अधिकार पालकमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आले होते. त्यानुसार पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात या दोन नावाला पसंती दिली. नायगावला नगराध्यक्षपदी कॉँग्रेसच्या गीता जाधव तर उपाध्यक्षपदी विजय चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

माहूर नगरपंचायतीसाठी मात्र चुरस निर्माण झाली होती. काँग्रेसकडून राजेंद्र केशवे तर राष्ट्रवादी काँगेसकडून फिरोज दोसानी यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले. या ठिकाणी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत शेवटपर्यंत एकमत झाले नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची अपेक्षित आघाडी झाली. माहूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे फिरोज दोसानी यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ज्ञानेश्वर लाड यांची निवड झाली.

जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरला तो माहूरच्या निवडणुकीचा. कारण राज्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाआघाडी आहे. त्यामुळे माहूरला काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, महाविकास आघाडी माहूरला शेवटपर्यंत झाली नाही. राष्ट्रवादीचे सात आणि शिवसेनेचे तीन असे दहा जण एकत्र आले तर कॉँग्रेसचे सहा व भाजपचा एक सदस्य वेगळे राहिले. राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जोतिबा खराटे यांनी एकत्र येत सत्ता मिळवली. त्यामुळे कॉँग्रेसला सत्तेबाहेर रहावे लागले. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची धुसपुस गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून आता आगामी निवडणुकीत किनवट आणि माहूरला हे दोन पक्ष एकत्र येतील, अशी शक्यता कमीच दिसून येत आहे.

Web Title: Election Result Mahavikas Aghadi Mahur Ardhapur Naigaon Won Congress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top