नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावाला आता स्मशान व दफनभूमी राहणार

file photo
file photo

नांदेड - जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना आपल्या हक्काची स्मशान व दफनभूमी असावी, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार महसूल व जिल्हा परिषद यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्नरत असून लवकरच प्रत्येक ग्रामपंचायत या भावनिक प्रश्नाची कोंडी दूर करुन ग्रामस्थांना दिलासा दिला जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी दिला.

नांदेड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना स्वत:ची स्मशान व दफनभूमी नसल्याने मोठ्या भावनिक आणि गुंतागुंतीच्या पेचाला सामोरे जावे लागत होते. शासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन यातून मार्ग काढण्यासाठी गाव तेथे स्मशान व दफनभूमी ही मोहिम हाती घेतली. या मोहिमेची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे - ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व तहसिलदार यांची संयुक्त आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी माहिती दिली.

कालबद्ध कार्यक्रमाचे आयोजन
प्रत्येक तालुक्यांच्या ठिकाणाहून तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी एकत्र येऊन आपआपल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सद्यस्थिती दर्शक अहवालाची मांडणी करुन त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक अडचणीही निदर्शनास आणून दिल्या. ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा नाही अशा गावांसाठी ग्रामपंचायतकडे उपलब्ध गायरान व इतर जागेवर स्मशान व दफनभूमी उभी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीकडे गायरान व इतर कसलीही जमीन नाही अशा गावांमध्ये दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जागा दिल्यास त्यांचा गौरव व सन्मान करुन त्या जमीनी स्विकारल्या जातील असेही शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या गावात दानशूर व्यक्ती पुढे आले नाही तर त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत खासगी असलेल्या जमिनी विकत घेण्याचे प्रावधानही करण्यात आले आहे. यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.

ग्रामपंचायतनिहाय स्मशान व दफनभूमीबाबत वस्तुस्थिती
नांदेड - १६ ग्रामपंचायतींना दफनभुमीला जागा नाही, त्यापैकी तीन ग्रामपंचायतीजवळ गायरन जमीन आहे, १३ ग्रामपंचायतीसाठी खासगी जागा शोधाव्या लागतील. अर्धापूर - सात ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी एक ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन तर सहा ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. मुदखेड - सहा ग्रामपंचायतींना जागा नाहीत, त्यापैकी पाच ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन तर एक ग्रामपंचायतींना जागा शोधावी लागेल. हदगाव - ३९ ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी २१ ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे तर १८ ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. हिमायतनगर - १३ ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी सात ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन तर सहा ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. किनवट - ४३ ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी ३३ ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, तर दहा ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. माहूर - ४० ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी १९ ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, तर २१ ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. भोकर - २४ ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी दहा ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे तर १४ ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. हदगाव - पाच ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी पाच ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे. धर्माबाद - १४ ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी चार ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे. तर दहा ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. बिलोली - २१ ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी १५ ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे. सहा ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. नायगाव - दहा ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी सहा ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे तर चार ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. देगलूर - २१ ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी दहा ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे तर ११ ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. मुखेड - ३२ ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी ३१ ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे, तर एक ग्रामपंचायीला जागा शोधावी लागेल. कंधार - दहा ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी सहा ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे तर चार ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. लोहा - ३९ ग्रामपंचायतींना जागा नाहीत त्यापैकी १७ ग्रामपंचायतीजवळ गायरान जमीन आहे तर २२ ग्रामपंचायतींना जागा शोधाव्या लागतील. सदर ग्रामपंचायतनिहाय प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com