esakal | family dispute brothers murder by big brother in naigaon crime news
sakal

बोलून बातमी शोधा

कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या

कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने केला छोट्या भावाचा खून

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : कौटुंबिक वादातून गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे मोठ्या भावानेच लहान भावाच्या डोळ्यात तिखट टाकून धारधार शस्त्राने वार करुन खुन केल्याची घटना तालुक्यातील टेंभुर्णी येथे मंगळवारी (ता. १३) घडली. सदर प्रकरणी वडीलांच्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात मुलाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुढी पाडव्याच्या दिवशीच घडलेल्या घटनेने नायगाव हळहळले.

सदरच्या घटनेची माहिती समजताच नायगावचे पोलिस उपनिरीक्षक श्री. बाचावार यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उतरीय तपासणीसाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सिध्देश्वर धुमाळ यांनीही टेंभुर्णी येथे भेट देवून घटनेची माहिती घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी येथील माधवराव वडजे यांना दोन मुले होती. मोठा संदीप तर दुसरा विश्वजित पण या दोन भावात मागच्या एक दिड वर्षांपासून कौटुंबिक वाद होता. एक वर्षापूर्वी दोघा भावात असेच जोरदार भांडणे होत असतांना संदीप वडजे यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली असता विश्वजितने त्यांच्यावरच चाकुने हल्ला केला होता.

या घटनेपासून दोन भावातील वाद विकोपाला गेला. त्यामुळे नातेवाईकांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला व दोघांना वेगळे केले. वाद मिटला असला तरी संदीपची पत्नी भितीने नांदायलाच यायला तयार नव्हती. त्यामुळे याचा राग संदीपच्या डोक्यात होता. त्याचबरोबर विश्वजित अधूनमधून तुला बघतो अशा धमक्याही देत होता त्यामुळे आपल्या जिवितास धोका होवू शकतो अशी भावना निर्माण झाली त्यामुळे भावाचा काटा काढल्याशिवाय आपण सुखी होणार नाही अशी मनाशी पक्की खुनगाठ बांधून ठेवली होती. आणि तशी संधी सोमवारी (ता. १२) रात्री चालून आली.

टेंभुर्णी येथील नवी आबादीमध्ये कँनालच्या बाजूला विश्वजित बांधकाम करत होता आणि (ता. १२) च्या रात्री बांधकाम होत असलेल्या घरासमोरच झोपलेला असतांना (ता. १३) च्या पहाटे झोपीत असलेल्या विश्वजितच्या डोळ्यात तिखट टाकून धारधार शस्त्राने गळ्यावर वार केला. या हल्ल्यात विश्वजीत जागीच गतप्राण झाला. या प्रकरणी मयताचे वडील माधवराव विठ्ठलराव वडजे यांनी नायगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन संदीप माधवराव वडजे याच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्वर धुमाळ करत आहेत.

loading image