बळीराजा पुन्हा संकटात : बोंडआळीमुळे पांढरे सोने कवडीमोल

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 18 November 2020

सद्यस्थितीत कापसाच्या उत्पन्नातून खर्च निघणे अवघड झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. वास्तविक पाहता अनेक शेतकऱ्यांचा वार्षिक ताळेबंद हा सोयाबीन व कापसाच्या उत्पन्नावर अवलंबून असतो.

नांदेड : सतत पडणारा दुष्काळ आणि त्यात यंदा परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्यातून शेतकरी अद्याप सावरला नाही. हाती आलेल्या पिकालाही बाजारपेठेत भाव नाही. त्यामुळे अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर बोंडआळीचे नवे संकट उभे राहिले आहे.कापूस हे नगदी पीक समजले जाते. या पिकावर शेतकऱ्यांचे बजेट अवलंबून असते. परंतु बोंडआळीमुळे पांढरे सोने कवडीमोल झाले आहे. 

सद्यस्थितीत कापसाच्या उत्पन्नातून खर्च निघणे अवघड झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. वास्तविक पाहता अनेक शेतकऱ्यांचा वार्षिक ताळेबंद हा सोयाबीन व कापसाच्या उत्पन्नावर अवलंबून असतो. या पिकावर आज अनेक शेतकरी दिवाळीचा सण साजरा करतात. परंतु यंदा सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने सुरुवात करुन देत खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन पिके मातीमोल केली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची उरलीसुरली मदार कापूस पिकावर होती.

हेही वाचानांदेड : वरसे धनेर कोट दवाळी, बापू तोन मेरा- बंजारा समाजात पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी -

परंतु मागील काही दिवसात वातावरणात बदल झाल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकावर बोंडआळीने आक्रमण केले आहे. या बोंडआळीचा सर्वाधिक फटका हा जिल्ह्यातील आदिवासीबहुल असलेल्या किनवट तालुक्याला बसला आहे. कापसाच्या उत्पन्नातून उत्पादन खर्च निघत नसल्याने हतबल झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी अक्षरशः उभ्या कापसाच्या पिकात चरण्यासाठी जनावरे सोडले आहेत. तर काही शेतकरी उभी पराटी उपटून फेकून देत आहेत. अचानक आलेल्या संकटामुळे कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. यंदा बोंडआळीने आक्रमण केल्याने नोव्हेंबर महिन्यात पांढऱ्या सोन्याची नासाडी झाली आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer in trouble again: white gold is ruined due to bondage nanded news