Video - हळद लागवडीसाठी शेतकरी जमिनीच्या पूर्वमशागतीत व्यस्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी सध्या हळद लागवडीसाठी जमिनीच्या पूर्वमशागतीमध्ये व्यस्त झाले आहेत.  

नांदेड : साधारणतः हळद पिकाची लागवड १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते. त्यामुळे जिल्ह्यात शास्त्रीय दृष्टिकोनातून लागवडीपूर्व जमिनीची मशागत करण्यात शेतकरी सध्या व्यस्त असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

नगदी पीक म्हणून हळदीकडे बघितले जाते. त्यामुळे कपाशीप्रमाणेच हळद पीकही नांदेड, हिंगोली व परभणी  जिल्ह्यात घेतले जाते. हळदीची लागवड ही १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी सध्या हळद लागवडीसाठी जमिनीच्या पूर्वमशागतीमध्ये व्यस्त झाले आहेत.  

अशी करावी जमिनीची पूर्वमशागत
कुठल्याही पीकांची लागवड ही शास्त्रीपद्धतीने केल्यास उत्पादन चांगले होते. त्यामुळे हळद पिकाची लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली निचरा करून घेणे आवश्‍यक आहे.  हळद लागवडीसाठी जमिनीची खोली २५ ते ३० सेंंटी मीटर असायला पाहिजे. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घ्यावे. हळदीचे कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीमध्ये हवा खेळती राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हळद पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची उभी- आडवी नांगरट करून घ्यावी. शेणखताची मात्रा कमी प्रमाणात उपलब्ध झाल्यास इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा.  

हेही वाचा - काशीफळाने दाखविली शेतकऱ्यांना काशी ! - ​

हळदीला अनन्यसाधारण महत्त्व
आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. सामाजिक कार्यातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  

येथे क्लिक कराच - ‘कोरोना’ करता का म्हणत केली मारहाण अन्...

खत व्यवस्थापन
सेंद्रिय खतांमध्ये कोंबडीखत, गांडुळखत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. लागवडीच्यावेळी आणि मोठ्या खांदणीचेवेळी ही खते द्यावीत. एकरी १० टन शेणखत किंवा दोन टन गांडुळखत किंवा कोंबडीखतामध्ये २०० किलो सुपर फॉस्फेट मिसळून बेडच्या मातीत मिसळले जाईल हे पहावे. रासायनिक खतांमध्ये लागवडीपुर्वी बेडवर दुफणीच्या सहाय्याने एकरी १०० किलो डिएपी + १०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश + १०० किलो निंबोळी पेंड + २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट + १० किलो बेनसल्फ (सल्फर) + १० किलो सुक्ष्मअन्नद्रव्य मिश्रण एकत्र मिसळू पेरून द्यावीत.  

हेही वाचाच - प्रशासनाचा दणका अन् वाळू वाहतुकीला लगाम

आंतरमशागत कशी कराल?                                                       हळदीचे कोंब उगवणीच्या काळात तणे वाढु देवू नयेत. अन्यथा हळदीच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे खुरपणी करून तणे काढावीत. एक ते दीड महिन्यांनी रासायनिक खतांची दुसरी मात्रा देतानांच झाडाचे बाजूस हलकी कुदळणी करून पीकाला मातीची भर द्यावी. यालाच उटाळणी असेही म्हणतात. यामुळे तंतुमुळे तुटून नवीन फूट येण्यास मदत होते. तसेच गड्ड्यांच्या भोवतालची माती भुसभुशीत झाल्याने कंदाची वाढ चांगली होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Engaged In Land For Cultivation Turmeric Nanded News