लढा कोरोनाविरुध्दचा; महावितरणची भक्कम तटबंदी- डॉ. मोहन दिवटे

संकटे कितीही आली तरी ती परतावयाची असतात. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी शासन आणि प्रशासन पातळीवरुन अनेकविध प्रयत्न सुरुच आहेत. लोकांचाही त्यात चांगला प्रतिसाद आहे.
महावितरण
महावितरण

नांदेड : कोरोना थांबलेला नाही. दुर्दैवाने पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट (second wave)अधिक जिवघेणी ठरतांना दिसते. अशा किती लाटा येणार आहेत, माहित नाही. प्लेगच्या साथीनंतरचे हे सर्वाधिक मोठे संकट असावे. कोरोनानंतर (corona) पुन्हा प्लेगची साथ येण्याचा अहवाल बीबीसीने दिलाय. चीनमध्ये (china)नुकतेच ब्युबॉनिक प्लेगचे रुग्ण आढळले आहेत. चीन भारतासाठी अनेक साथीच्या आजाराचे प्रवेशव्दार ठरलाय. तिथूनच आलेला कोरोना आपल्याकडे अधिकच पसरतोय. पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दापेक्षाही (second war) कोरोनाचे संकट भयंकर दिसतेय.

संकटे कितीही आली तरी ती परतावयाची असतात. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी शासन आणि प्रशासन पातळीवरुन अनेकविध प्रयत्न सुरुच आहेत. लोकांचाही त्यात चांगला प्रतिसाद आहे. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी आरोग्य, महसुल, पोलिस आणि विदयुत यंत्रणा मोठ्या हिम्मतीने फ्रंट वॉरिअर म्हणून काम करीत आहेत. कोरोनाच्या मुकाबल्यात सर्व यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी मुळात विद्युत यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यान्वित असणे आवश्यक असते. तेच प्रभावी योगदान देण्यात राज्यात महावितरण कुठेही कमी पडले नाही. कमीच पडले नाही, नव्हे तर अधिकाधिक चांगली, अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठ्याची सेवा देण्यात महावितरण प्रो-ॲक्टीव्ह राहिले आहे.

हेही वाचा - भगवान वाघमारे यांच्या मृत्यूबद्दल पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सिद्धेश्वर धुमाळ, पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी शोक व्यक्त करत पोलिसांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तणपूरे तसेच महावितरणचे अध्यक्ष आणि व्यस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या पुढाकारात महावितरणला कोरोनाविरुध्दच्या लढयात फ्रंट वॉरिअर म्हणून प्रभावी कामगिरी करता येत आहे. विजेच्या विक्रीतून मिळणारा महसुल हाच महावितरणच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत आहे. तो अत्यल्प प्रमाणात मिळत असतांनाही कोरोनाच्या लढाईतील महावितरणची प्रकाशमान कामगिरी कौतुकाचा विषय ठरावा. या लढाईत महावितरणचे सुमारे दोनशे पेक्षा अधिक शिलेदार कामी आले. विजेची सेवा बजावतांना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्या दोनशे कर्मचाऱ्यांत मुख्य अभियंत्यापासून लाईनस्टाफ पदापर्यंतच्या वीज कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय, सात हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कोरोनाने बाधित आहेत. अशा परिस्थितही वीज कर्मचारी ऊन- वारा आणि पावसात फ्रंटलाईन वॉरियर म्हणून काम करत आहेत. कोरोनापासून वीज कर्मचारी सुरक्षित राहवा, बाधित कर्मचारी लवकर पूर्ववत तंदुरुस्त व्हावा, यासाठी कोव्हिड लसीकरण कॅम्प, विलगीकरण कक्ष स्थापन करुन त्यांना मडिक्लेमच्या सुविधा महावितरणतर्फे देण्यात येत आहेत.

महावितरणला ग्राहक आणि राज्याचेही हित महत्वाचे आहे. कोरोनाविरुध्दच्या या लढाईत राज्यात अधिकाधिक चांगला, अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा देणे आवश्यक आहे. ते काम महावितरणकडून प्रभावीपणे करण्यात आले, करण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून वीज ग्राहकांना पुरेशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत. प्रभावी वीज पुरवठयासाठी पुरेशा प्रमाणात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात आले. रहिवाशी, वाणिजिक, औदयोगिक आणि कृषी वर्गवारीतील ग्राहकांना चांगल्या सेवेसाठी सुमारे पाच ते साडेपाच हजार कोटीच्या खर्चाची उच्चदाब वितरण प्रणाली राबवून लाखो शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात आल्या. पारपंरिक आणि सौरऊर्जेच्या माध्यमातूनही लाखो शेतकऱ्यांना महावितरणने आपल्या यंत्रणेत सामावून घेतले. मागच्या काळात सौभाग्य योजनेच्या माध्यमातून राज्यात 12. 48 लाख ग्राहकांच्या घरात वीज प्रकाशमान केली. यासाठी महावितरणचा 16 हजार 320 कोटी रुपयांचा खर्च झाला. ग्रामीण महाराष्ट्रात विजेच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दोन हजार 164 कोटी रुपयांची दीन दयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना राबविण्यात आली. पाच हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये 3175.15 कोटी रुपयांची एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबविण्यात आल्याने शहरी भागातील विदयुत यंत्रणा अधिक सक्षम बनली. त्यामुळे राज्यात विदयुत पुरवठा करण्यातील अडचणी कमी झाल्या. त्याच बरोबर ग्राहक समाधानही वाढले. अनेक संकटांनी खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी धोरण- 2020 अंतर्गत थकबाकीमुक्तीची योजना राबविण्यात आली. यात राज्यातील लाखों शेतकऱ्यांनी सवलतीचा लाभ घेत थकबाकीमुक्त होण्याची संधी मिळविली.

येथे क्लिक करा - नांदेड : अवघड क्षेत्रातील निकष पात्र शाळा अपात्र; शिक्षणाधिकाऱ्यांची मनमानी

पायाभूत सुविधा आणि ग्राहक समाधानाच्या बाबतीत चर्चा करायची झाल्यास महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पुनर्रचनेनंतर म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीसह महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्या अस्तित्त्वात आल्या. तिन्ही कंपन्यांनी आपापल्या क्षेत्रात अतिशय समर्पित पद्धतीने काम केले. त्यामुळेच आज महाराष्ट्राला विद्युत क्षेत्रातला पूर्वलौकिक परत मिळतोय. 2005 साली यंत्रणा एवढी जर्जर होती की, मागणी एवढी म्हणजे सुमारे 12,500 मेगावॅट वीज उपलब्ध झाली तरी ती ग्राहकांपर्यंत वाहून नेण्याची क्षमता वितरण यंत्रणेत नव्हती. आज महावितरणची यंत्रणा 20,000 मेगावॅटपेक्षा अधिक वीज वाहून नेण्यासाठी सक्षम आहे. वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी महावितरणने दोन टप्प्यातील पायाभूत आराखडा योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक विद्युत विकास योजना यशस्वीपणे राबवल्या. ग्राहकाला योग्य दाबाने दर्जेदार वीजपुरवठा करण्यासह अनुषंगिक सेवाही चांगल्या पद्धतीने मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व जोडण्यांसाठी पूर्वीचा किचकट अर्ज बदलून केवळ एकपानी अर्ज करण्यात आला. ग्राहकाला आपल्या दारात यायला लागू नये, म्हणून सर्व वीजजोडण्या ऑनलाईन देण्याची सोय करण्यात आली. सौभाग्यसारख्या योजनेमुळे शेकडो गावे व वाड्यावस्त्यांवरील लाखो घरात वीज पोचली. आज महावितरणची ग्राहक संख्या 1.69 कोटींवरून पावणेतीन कोटीपेक्षा अधिक वाढली.

महावितरणने ग्राहकसेवेसाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे केंद्रिकृत बिलिंग प्रणाली. ग्राहकाला वापरलेल्या विजेचे अचूक व वेळेवर बिल मिळावे यासाठी तसेच बिल भरण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी वीजबिल तयार करण्याची प्रक्रिया केंद्रिय स्तरावर सुरू झाली. देशातील विद्युत वितरण क्षेत्रात प्रथमच असा नावीन्यपूर्ण प्रयोग महावितरणमध्ये राबवण्यात येत आहे. आधीच्या बिलिंग पद्धतीमुळे वीजबिलांची छपाई ते ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी 7 ते 8 दिवस लागायचे. ग्राहकांना वेळेत बिल न मिळाल्यास तत्पर देयक भरणा सूट (प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट) मिळण्यास अडचणी यायच्या. केंद्रिय बिलिंग प्रणालीमुळे मोबाईल मीटर रीडिंग ॲपमुळे रिअल टाईम रीडिंग उपलब्ध होते. त्यामुळे त्वरित बिल तयार होऊन ते ग्राहकांपर्यंत लवकर पोचते. मीटर रीडिंगमधील पारदर्शकतेसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी व इन्फ्रारेड मीटर्स बसविली गेली. उद्योगांसाठी स्वयंचलित मीटर रीडिंगची यंत्रणा आली. ग्राहकाला वीजबिले भरण्यासाठी ऑनलाईनसह वीज बिल भरणा केंद्रांची सोयही आहे. आधुनिकतेची कास धरत महावितरणने ग्राहकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल ॲप विकसित केले. ग्राहकांना आता मोबाईल ॲपवरच बिलाचा तपशील पाहण्यासह त्यावरून बिलही भरता येते. ग्राहकांना बिलाची रक्कम, खंडित वीजपुरवठा आदी माहिती देण्यासाठी एसएमएस सेवेस सुरुवात करण्यात आली. 90 टक्केपेक्षा अधिक ग्राहकांनी या सेवेसाठी नोंदणी केलेली आहे. कोरोनाच्या काळात स्वत:च मोबाईलवरुन मीटर रिडिंग पाठविण्याची सोय ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्थात, महावितरणने आपल्या यंत्रणेत मोठे सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्या बदलांचा कोरोना सारख्या संकटसमयी चांगला उपयोग होतांना दिसतो.

- डॉ. मोहन दिवटे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, लातूर यांच्या फेसबुक पेजवरुन साभार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com