यंदाची सप्तपदीही कोरोनाच्या चक्रव्युहात, ३० नोव्हेंबरला पहिला विवाह मुहूर्त

प्रमोद चौधरी | Thursday, 19 November 2020

तुळसी विवाहापासून लग्न सोहळ्यांना सुरुवात होते. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे लग्न सोहळ्यांवरही निर्बंध असणार आहेत.   

नांदेड : गतवर्षी मार्च महिन्यापासून देशासह राज्यात लाॅकडाउन घोषित झाल्याने मार्चनंतरच्या सप्तपदी वरात ना ब्यांडबाजा, ना मंगलकार्य अशा मोजक्या दहा पाच लोकांच्या उपस्थितीत पार पडल्या. यंदा विवाह मुहूर्त आठ दिवसांवर आले असले तरी; अद्यापही राज्यात कोरोनाचे थैमान कायम असल्याने यंदा असलेले ५० विवाह मुहूर्तही चक्रव्यूहात असल्याचे चित्र आहे.

राज्यात मार्च महिन्यापासून लाॅकडाउन घोषित झाल्याने गत वर्षी मार्च नंतरच्या विवाहावर पुरते विरजण पडले होते. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत काहींचे विवाह वेळेत मुहूर्तावर तर काहींचे जिल्हाबंदीमुळे लांबणीवर पडून उशिराने थातुरमातूर पद्धतीने उरकण्यात आलेत. यंदा तुळशी विवाह २६ नोव्हेंबरला असून ३० नोव्हेंबरपासून पुढे विवाह मुहूर्त आहेत. यावर्षी एकूण ५० विवाहाचे मुहूर्त असून सर्वाधिक विवाह मुहूर्त मे महिन्यात (१४) आहेत. यंदा गुरु शुक्र असल्यामुळे पौष, माघ व फाल्गुन महिन्यात विवाह मुहूर्त नसल्याचे पंचागाचे अभ्यासक शांताराम हिवरकर यांनी सांगितले.

हेही वाचा -  हिंगोली : सासू अन पतीने पत्नीचे केले औक्षण, जिजाऊ ब्रिगेडचा उपक्रम 

तुळशी विवाहाला २६ नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे. मात्र, विवाहउत्सुक वर वधुंची शोधमोहीम कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या तरी थंड बस्त्यातच आहे. यावर्षी धावपळीत वर वधूची जुळलेली विवाह तुळशी विवाहानंतर होणार असली तरी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच सध्या तरी होणार आहे. 

हे देखील वाचाच - नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मतदारसंघातच रस्त्याची दुरावस्था

कोरोनामुळे मंगलकार्यालयांमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच विवाह उरकवावा लागणार आहे. परिणामी यंदाचीही सप्तपदी कोरोनाचे चक्रव्यूहात अडकणार आहे. विवाह मुहूर्त ३० नोव्हेंबरला प्रारंभ होत आहे. यंदाला ५० विवाह मुहूर्त असून सर्वाधिक विवाह मुहूर्त मे महिन्यात आहेत.
 
असे आहेत यंदाचे विवाह मुहूर्त

 

महिना तारीख
नोव्हेंबर 30
डिसेंबर 7, 8, 9, 17, 19, 23, 24, 27
जानेवारी 3, 5, 6, 7, 8, 9, 10
फेब्रुवारी 15 आणि 16
मार्च नाही
एप्रिल 22, 24, 25, 26, 28, 29, 30
मे 1, 2, 3, 4, 8, 13, 20, 21, 22, 24, 26, 28, 30, 31
जून 4, 6, 16, 19, 20, 26, 27, 28
जुलै 1, 3, 13