esakal | अर्धापूर खूनप्रकरणातील चारजणांना सात दिवसाची पोलिस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस कोठडी

अर्धापूर खूनप्रकरणातील चारजणांना सात दिवसाची पोलिस कोठडी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : फायनान्सच्या पैशावरुन नांदेडच्या तरुणाचा जांभरुन (ता. नांदेड) पाटीजवळ खून करण्यात आला होता. त्याप्रकरणात अगोदरच एका मारेकऱ्यास अटक केली होती तो पोलिस कोठडीत आहे. मंगळवारी (ता. २५) रात्री या प्रकरणातील पुन्हा चार आरोपी स्वत: अर्धापूर पोलिस ठाण्यात हजर झाल्याचे सांगण्यात आले. या चारही जणांना पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी बुधवारी (ता. २६) दुपारी अर्धापूर न्यायालयासमोर हजर केले. न्यायाधीश तेलगावकर यांनी चारही जणांना सात दिवसााच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे.

ता. २० मे रोजी धनेगाव येथील माजिद गॅरेजवरुन फायनान्सच्या पैशावरुन अब्दुल जब्बार मोहम्मद नजीर (वय 35) याला उचलून गाडीत टाकून अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेले. ता. 21 मे रोजी अब्दुल जब्बारचा मृतदेह जांभरुन, बामणी पाटीजवळ कॅनाल लगत सापडला. त्याच्या शरिरावर असंख्य जागी मार होता. त्यानंतर त्यांचे भाऊ मोहम्मद जावेद मोहम्मद नजीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अर्धापूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी ता. 21 मे रोजीच शेख अब्दुल शेख लतिफ (वय ३२) हा मारेकऱ्यांमधील एक पोलिसासमक्ष हजर झाला आणि त्याने सांगितलेल्या माहितीनुसार अब्दुल जब्बारकडे खालसा फायनान्सचे पैसे येणे होते. आणि त्यासाठी त्याला उचलून आणून मी, मजहर खान नावीद खान रा. खडकपुरा, वसिम भाई, सुशांत आणि खालसा फायनान्सचे मोन्टीसिंघ यांनी खून केल्याची कबुली दिली. शेख अब्दुल शेख लतिफला न्यायालयाने ता. 22 मे रोजी तीन दिवसांची अर्थात 25 मेपर्यंत पोलिस कोठडी मंजुर केली होती.

हेही वाचा - कोरोना महामारीचा गैरफायदा घेत कामगार व शेतकऱ्यांवर अन्यायकारक कायदे लादले जात आहेत असे आरोप करत भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली परभणीत आंदोलन करण्यात आले.

ता. 25 मे रोजी रात्री अत्यंत नाटयमयरित्या या प्रकरणातील हरप्रितसिंघ उर्फ मोन्टीसिंघ नरेंद्रसिंघ मेजर (वय 33), मजहर खान नावीद खान (वय 34), सुशांत प्रभाकर भुजबळे (वय 26), शेख वसीम अकरम मोहम्मद रऊफ (वय 34) असे चार आरोपी पोलिस ठाणे अर्धापूर येथे हजर झाले. अर्धापूरचे पोलिस निरिक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी ता. 25 मे रोजी रात्री या चौघांना अटक केली. बुधवारी (ता. 26) मे रोजी श्री. गुट्टे व त्यांचे सहकारी पोलिस अंमलदार गुरदास आरेवार, श्री. कांबळे, श्री. रणविर, श्री. डांगे यांनी या चौघांना न्यायालयात हजर केले आणि पोलिस कोठडीची मागणी केली. अर्धापूर पोलिसांची मागणी न्यायालयाने मान्य करत सात दिवसांसाठी पोलिस कोठडी मंजुर केली आहे.