Nanded : लाख रोख उकळले : गुन्हा दाखल होताच खंडणीबहाद्दर अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud Crime News

Nanded Fraud : लाख रोख उकळले : गुन्हा दाखल होताच खंडणीबहाद्दर अटकेत

छत्रपती संभाजीनगर : पैठण औद्योगिक वसाहतीत कंपनी चालवायची असेल तर चार कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे धमकावून त्यापैकी पाच लाख रोख आणि वीस हजार रुपयांचा हप्ता मागून आजवर दीड लाख रुपये खंडणी उकळली. हा प्रकार डिसेंबर २०२२ दरम्यान घडला होता.

मात्र, खंडणीखोराने वारंवार कंपनीत जाऊन कंपनी मालकासह अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या धमक्या दिल्या. कंपनीच्या कारभाराविरोधात सरकारी विभागात खोटे अर्ज देऊन अनेकदा बदनामी केली. हा त्रास थांबविण्यासाठी चार कोटींची खंडणीची मागणी करण्यात आली. अखेर कंपनी प्रशासनाने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल करताच पोलिस अधीक्षकांच्या पथकाने खंडणीबहाद्दराला २४ मे रोजी अटक केली. विष्णू आसाराम बोडखे (५७, रा. सेंटपॉल, मुधलवाडी, ता. पैठण असे आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी २४ मे रोजी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामवंत कंपनीच्या उद्योजकासह व्यवस्थापकाला मारहाण करण्याच्या धमक्या देऊन दिल्या होत्या, तसेच कंपनीच्या कारभारा विरोधात विविध सरकारी विभागात खोटे तक्रारी अर्जही दिले होते.

हा त्रास थांबवायचा असेल तर चार कोटी रुपये द्यावे लागतील अशी मागणी करून तत्काळ पाच लाख रुपये रोख आणि वीस हजार रुपये प्रति महिना खंडणी द्यावी लागेल अशी धमकी दिल्याप्रकरणात २३ मे रोजी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

आरोपी बोडखे हा थेट कंपनीत येऊन कंपनी कशी चालवता तेच बघतो असे म्हणत कंपनीत येऊन मारहाण करीन, ‘मला कोणाला कसे फसवायचे हे चांगले माहिती आहे’ असे म्हणत वारंवार पैशांसाठी धमकी देत असे.

त्याने दीड लाख रुपयेही उकळले, मात्र त्यानंतरही हा त्रास सहन न झाल्याने अखेर कंपनी व्यवस्थापनाने थेट पोलिस अधीक्षक कलवानिया यांच्याकडे धाव घेतली. त्यावर अधीक्षक कलवानिया यांनी तत्काळ पावले उचलत कारवाईचे आदेश देताच सहायक निरीक्षक भागवत नागरगोजे, उपनिरीक्षक दिलीप चौरे, राहुल मोहतमल, कृष्णा उगले, मिलिंद घाटेश्वर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

उद्योजकांनो, धमक्यांना बळी पडू नका : कलवानिया

उद्योजकांना कंपनी चालविण्यासंदर्भात कोणी धमकी देऊन खंडणी मागत असेल तर अशा धमक्यांना बळी पडू नका, पैशाची मागणी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नसून अशांविरोधात कडक कारवाई करणार आहोत, त्यामुळे कोणी खंडणी मागितली तर तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.