भयमुक्त जगण्यासाठी हवे स्वातंत्र्य...

अभय कुळकजाईकर | Friday, 14 August 2020

जगभरात कोरोना संसर्ग पसरला आणि होत्याचे नव्हते झाले. कोरोनाने काय केले नाही? अनेकजण मृत्यूमुखी पडले तर अनेकजण बेरोजगार झाले. व्यापार, उद्योग ठप्प झाले. सर्वसामान्यांपासून ते नेते, अधिकारी, कलाकारापर्यंत अनेकांना कोरोना झाला. गेल्या पाच महिन्यापासून अनेकजण कोरोनामुळे त्रस्त झाले आहेत. भारताला ता. १५ आॅगस्ट स्वातंत्र्य मिळाले पण आता कोरोनामुळे स्वातंत्र्य हिरावले का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नांदेड -  ‘भय इथले संपत नाही...’ या कवी ग्रेस यांच्या कवितेतील ओळीप्रमाणे सध्या कोरोनामुळे सर्वांचे आयुष्य झाले आहे. मागील पाच महिन्यापासून हे जीवन जगताना आलेली बंधने झुगारुन स्वातंत्र्यदिनी खऱ्या अर्थाने बंदिस्त व भयमुक्त जीवनातून बाहेर पडावे, अशी प्रत्येकाचीच मनोमन इच्छा आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येकालाच कोरोना संसर्गाशी दोन हात करुन त्यातून आपला आणि स्वकीयांचा मार्ग सुकर करावा लागणार आहे. यासाठी स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाने आपली जीवनशैली अजून चांगली होण्यासाठी वेगवेगळ्या बाबी अवलंबणे गरजेचे आहे. 

जगभरात कोरोना संसर्ग पसरला आणि होत्याचे नव्हते झाले. कोरोनाने काय केले नाही? अनेकजण मृत्यूमुखी पडले तर अनेकजण बेरोजगार झाले. व्यापार, उद्योग ठप्प झाले. सर्वसामान्यांपासून ते नेते, अधिकारी, कलाकारापर्यंत अनेकांना कोरोना झाला. गेल्या पाच महिन्यापासून अनेकजण कोरोनामुळे त्रस्त झाले आहेत. भारताला ता. १५ आॅगस्ट स्वातंत्र्य मिळाले पण आता कोरोनामुळे स्वातंत्र्य हिरावले का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने याबाबत प्रातिनिधीक स्वरुपात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

 

हेही वाचा - ई ‘सकाळ’चा दणका, रुग्णांना निकृष्ठ जेवण देणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई
 

कोरोनाचे सावट प्रासंगिक ः प्रा. बोरगावकर
कोरोनाने तहलका मचावलाय, हे खरेच. महासत्तांचेही दरवाजे त्याने खिळखिळे करून टाकलेत. आपल्या देशातही खूप उलटफेर झालेत. जगण्यातले नॉर्मसही बदलत चाललेत. तहेदिल गळाभेट घेणारी माणसं सुरक्षित अंतरावर भरवसा करायला लागलीत. हे जरी खरं असलं तरी कोरोनाची काय बिशाद आहे आमच्या स्वातंत्र्य विषयक भावनांना ठेच पोहचवायची. लता मंगेशकरांनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा जेव्हा ‘ए मेरे वतन के लोगो जरा व आॅख में भरलो पानी’ हे गाणं म्हटलं होत तेव्हा पंडीत नेहरू रडले होते. हे गाणं ऐकल्यावर माझ्याही पिढीतल्या लोकांचे डोळे भरून येतात. पुढच्या अनगिनत पिढ्यांचे डोळेही हे गाणं ऐकल्यावर भरुन येणारच. असे किती साथीचे रोग येतील आणि जातील. आमचे ईरादे नेक आणि मजबूत राहिले तर कोरोना इतिहासजमा व्हायला फारसा वेळ लागणार नाही. त्यामुळे हे कोरोनाचे सावट प्रासंगिक आहे तर आमचा स्वातंत्र्यदिन चिरायु आहे. 
- प्रा. मनोज बोरगावकर, कवी - साहित्यिक.

कोरोनाकडे सकारात्मक दृष्टीने पहा ः डॉ. देशपांडे
कोरोनापूर्वीचे जग आणि कोरोनानंतरचे जग यात खूप बदल झाला आहे. पूर्वीचे जग धावपळीचे आणि तीव्र स्पर्धेचे झाले होते. आपण सर्वांनी वेळेच्या मर्यादेत स्वतःला जखडून घेतले होते. आता कोरोनानंतरचे जग बदलत चालले आहे. तुम्हाला स्वतःची ओळख करुन देण्यास वेळ उपलब्ध करुन दिला. नातेसंबंध दृढ झाले. आपआपले छंद जोपासता आले. तुम्हाला उसंत मिळाली. स्वतःचे आणि इतरांच्या आरोग्याकडे पहायला वेळ मिळाला. त्यामुळे कोरोनाकडे संकट म्हणून नव्हे तर सकारात्मक दृष्टीने पहायला हवे.  
- डॉ. संदीप देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ.

 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड : कर्जमाफीचा जिल्ह्यातील एक लाख ४३ हजार शेतकऱ्यांना फायदा

 

सर्वांगीण आरोग्याचा झेंडा लवकर फडकावा ः डॉ. किन्हाळकर
हा स्वातंत्र्य दिन फार वेगळा आहे. प्रत्येकाला आपल्याच घरात अडकवून टाकलं आहे त्या सूक्ष्म विषाणूने. श्वास घेणं देखील त्या मास्कच्या कुंपणातच. लहान मुलं आणि वृद्ध लोकांचं निरागस स्वातंत्र्य हिरावले गेलेय; ते फार वेदनादायी वाटतं. मोबाइल फोन आणि इंटरनेट नसते तर? फार बंदिस्त वाटलं असतं आयुष्य. तरी देखील...स्पर्शाचे, गळाभेटीचे स्वातंत्र्य नाहीये. कदाचित यातूनच माणसांना माणसांचं मूल्य कळावे असा तर ईश्वरी संकेत नसेल? असा सकारात्मक विचार करण्याचं स्वातंत्र्य तर आपल्याला आहेच.. तेच करू या..! सर्वांगीण आरोग्याचा झेंडा लवकरात लवकर फडकावा.. हीच सदिच्छा!
- डॉ. वृषाली किन्हाळकर, स्त्रीरोग तज्ज्ञ, कवयित्री.  

हे ही दिवस जातील - धर्मापुरीकर
स्वाधीनता ही सर्वकालीक स्थिती असून त्याचा तत्कालीन परिस्थितीशी संबंध जोडता येत नाही. हे ही दिवस जातील, एवढा विश्वास आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गाची भीती बाळगण्यापेक्षा एकमेकांना धीर देऊन राहणे गरजेचे आहे. 
- मधुकर धर्मापुरीकर, साहित्यिक.