गणेश वनसागरे: काळ्या मातीतला कलावंत

file photo
file photo

नांदेड : गणेश वनसागरे हा नांदेडचा लोककलावंत. काळ्या मातीतला हा कलावंत काल कोरोनाचा बळी ठरला. अवघ्या पन्नासीत तो गेला. ही घटना चुटपूट लावणारी आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात असलेलं गोळेगाव. हे या कलावंताचं गाव. त्याला शालेय जीवनापासूनच नृत्य आणि नाट्याची विशेष आवड. गणेश वनसागरे या कलावंताची पहिल्यांदा भेट झाली कथाकार मित्र दिगंबर कदम यांच्या लोकसंवादमध्ये. बहुधा ते दुसरे अथवा तिसरे साहित्य संमेलन असावे. विख्यात लेखिका प्रतिमा इंगोले या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या आणि आम्ही उद्घाटक होतो. देवीदास फुलारी, नारायण शिंदे,महेश मोरे ही मित्र मंडळीसोबत होतीच. 

कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी गणेश वनसागरे यांच्या गणगौळणीची झलक झाली. संमेलनाच्या शेवटच्या टप्प्यात गणेशच्या लावण्यांचा कार्यक्रम होता. त्यातील 'या रावजी, बसा भावजी..' या लावणीचा तुकडा त्याने आरंभीच सादर केला आणि आख्खा सभामंडप डोक्यावर घेतला. शिट्ट्या आणि वाहवांचा वर्षाव झाला. तेव्हाच या कलावंतामध्ये असलेल्या कला सामर्थ्याची आम्हाला जाणीव झाली. पुढे माळेगाव यात्रा आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक मंचावरुन गणेश वनसागरे हे नाव ठळक होत गेलं. मात्र दरवर्षी लोकसंवादमध्ये त्याची भेट ठरलेली. रा. रं. बोराडे, विठ्ठल वाघ, कौतिकराव ठाले पाटील अशा दिग्गजांसमोर त्याने आपली ठेवणीतली लावणी सादर केलेली. दिगंबर कदम यांच्या खांद्याला खांदा लाऊन लोकसंवादासाठी राबायचा. आपली बिनतोड कला पेश करायचा.

गणेश वनसागरे याचा कोणी गुरु नव्हता. त्याचा गुरु तोच. स्रीच्या पोषाखात जेव्हा तो मंचावर यायचा तेव्हा हा पुरुष आहे हे सांगूनही खरे वाटत नसे. लोकसंवादमध्ये पहिल्यांदा जेव्हा गणेश नृत्य करायला स्टेजवर आला तेव्हा पंचक्रोशीतील तरुणांनी नर्तकी समजून त्याच्या भोवती गराडा घातला. तेव्हा दिगंबर कदमांना आपल्या खास स्टाईलमध्ये "बापू ही पोरगी नव्हं रे.. हुरळून जाऊ नका.. पोरगं हाय ते" असं माईकातून पुन: पुन्हा सांगावं लागलं. इतकी बेमालूम वेशभूषा आणि अदाकारी गणेशने सादर केली होती. गणेश स्वतः चा मेकअप स्वतः च करायचा. स्री वेशभूषेसाठी लागणा-या बांगड्या,केशसंभार, कर्णभूषणे, हार, पैंजण, नथ, काजळ, लिपस्टिक, बुचडा, वेणी, कंबरपट्टा, दंडकडे इ. सर्व साहित्य त्याच्याकडे असायचं. कार्यक्रम सादर करण्यापूर्वी किती तरी वेळ तो आरशासमोर उभा राहून स्वत: ला नटवत असे. आपला मेकअप उत्तम झालेला आहे हे लक्षात आल्यावर हळूच एखादी बट डोळ्यावर उडवत असे. खरे तर गणेशला. स्रीपात्र शोभून दिसेल अशी अंगकांती लाभलेली होती. गोरापान वर्ण, टपोरे डोळे, सरळ नाक आणि उंचीपुरी देहयष्टी असलेला गणेश जेव्हा मंचावर यायचा आणि सभागृहाला झुकून वंदन करायचा तेव्हा प्रेक्षकांच्या कडाडून टाळ्या पडायच्या. गणगौळण, लावणी, भारुड, पोवाडा, कथ्थक हे सगळे प्रकार तो लीलया सादर करायचा. त्याने सादर केलेल्या बैठकी लावणीला वन्समोअर मिळाला नाही, असे कधी झाले नाही. त्याच्या भारुडाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होत.

गणेश वनसागरे हा गुरु नसलेला गुणी कलावंत. जेथे कुठे मंच मिळेल तेथे जाणारा. आपली कला इमानेइतबारे सादर करणारा. कधी मानधनासाठी अडून न बसणारा. प्रेक्षक, श्रोत्यांचे समाधान हीच माझी पुंजी या न्यायानं नम्र होणारा हा लोककलावंत. या लोककलावंताची दखल ना इलेक्ट्रॉनिक मिडियानं घेतली ना शासनानं घेतली. कलेचं शिगोशिग अंग असूनही या लोककलावंताला मोठा मंच गवसला नाही. आपल्या अवतीभोवतीचे किरकोळ कलावंत खूप कांतीमान झालेले दिसतात. परंतु गणेश सारख्या हरहुन्नरी कलावंताला मात्र व्यापक अंगण लाभत नाही. त्याची कला सर्वदूर जाऊ शकत नाही.

ही कलाप्रांताची मोठी हानी आहे
लोककलेसाठी आपलं जगणं सार्थकी लावणारा गणेश वनसागरे हा लोककलावंत कोरोना काळात गेला. या कलावंताला सतत  प्रोत्साहन देणारी आणि अपंगत्वाच्या आधारानं बँकेत सेवारत असलेली सहचारिणी, एक मुलगा आणि एक मुलगी यांना सोडून या बावनकशी कलावंताने आपली जीवनयात्रा मध्येच संपविली, ही मोठी यातनादायी बाब आहे. ही कलाप्रांताची मोठी हानी आहे. या बावनकशी कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली!
ही श्रंध्दांजली घेतली डाॅ. प्रा. जगदीश कदम यांच्या फेसबुक पेजवरुन साभार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com