esakal | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची गरुडभरारी...
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या निर्मितीमागे विधायक परंपरा आणि ग्रामीण परिसरासाठी सर्वोच्च शिक्षणाची श्रेष्ठ सुविधा ही जशी ठळक कारणं आहेत, तद्वतच काळाला दृष्टी देणाऱ्या निर्मोही, गांधीवादी, लढवय्या अशा पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या ध्येयनिष्ठ जीवनकर्त्यांचा सौरभही या विद्यापीठाच्या निर्मिती आणि प्रवासाला लागलेला आहे. शहरे आणि खेडी यांच्यात सेतू बांधणारे हे विद्यापीठ आहे.
- डॉ. केशव सखाराम देशमुख

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची गरुडभरारी...

sakal_logo
By
डॉ. केशव सखाराम देशमुख

केवळ परंपरेची री ओढणारे शिक्षण देण्यापेक्षा शिक्षणविभागांचे संकुलीकरण करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय तसेच जागतिक गुणवत्तेशी समान असे शिक्षण देणारे हे अनोखे विद्यापीठ आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, वेध, शोध, भाषाशिक्षण आणि परकीय भाषाभ्यास अशा एक नाही तर कित्येक प्रकारच्या विद्याशाखांचा सखोल अभ्यास या मौलिक विद्यापीठाने प्राधान्याचा मानला आहे.
         
स्वामीजींच्या जीवनात शिक्षण, शील, विचार आणि संस्कृती यांच्या उत्कर्षाला मोठा असा पैस लाभलेला होता. आज डॉ. उद्धव भोसले यांच्या अगदी नावीन्यपूर्ण, शिवाय गतिमान अशा कुलगुरुंच्या स्वच्छ अशा नेतृत्वाखाली हे विद्यापीठ खूप विधायक, विषय आणि बाबी घेऊन वाटचाल करताना दिसून येते. अगदी पुढच्या काही महिन्यांत हे विद्यापीठ ‘नॅक’ला सामोरे जात आहे. या विद्यापीठाची एकूण भूमी चढत्या, उंच, विस्तीर्ण अशा विष्णुपूरी-पांगरी गावशिवारांच्या परिसरात असून हवामान आणि निसर्ग या दोन्ही गोष्टी इथे हातांत हात घालून चालताना पहायला मिळतात.

‘एक शांतता आणि एक सुंदरता’ हे विद्यापीठाच्या या भूमीचे ठळक वैशिष्ट्य होय. विद्यापीठाची प्रधान इमारत डौलदार आणि देखणी असून इथे शिक्षणाच्या विविध संकुलांनाही स्थापत्य सौंदर्य लाभलेले आहे. हा परिसर बघताच कुणीही मोहित होऊन जावा, असा डौल विद्यापीठ सौंदर्याला लाभला आहे. ‘नालंदा गेट’ हे मूर्तिमंत शिक्षण, इतिहास, ज्ञान, संस्कृती यांचे चिन्हच ! पुढे लगेच, त्यागमूर्ती स्वामीजींचा पुतळा पहाताच मनाला एकप्रकारे ‘शांतीसुख’ लाभते. परिसरात जलसाठ्यांनी भरलेली अनेक बंधारे आणि सर्वत्र नटलेली हिरवाई पर्यटन श्रीमंती दर्शविते. या उभारणीचे सर्व श्रेय कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांचे. त्यांच्या कल्पकतेने आणि वेगवान कार्यपद्धतीमुळे या परिसराला जलमयता आणि जलव्यवस्थापनाला मूल्य लाभलेले आहे.

हेही वाचा - धक्कादायक : नांदेड जिल्ह्यातील ‘हा’ पाझर तलाव फुटून शेकडो हेक्टर शेती गेली खरडून

आज हे विद्यापीठ पाहिले की, आपण समाधानाने हरखून जातो. एकूण शैक्षणिक संदर्भात तसेच एकूण विकासात्मक कामांच्या अनुषंगाने कुलगुरु महोदयांनी प्रगती म्हणून दिलेले लक्ष, हे या विद्यापीठात पाऊल ठेवताच चटकन जाणवतेच. इथे खूप नवे आहे. आज, विद्यापीठात चित्रीकरणाचा श्रेष्ठ स्टुडिओ उभा राहातो आहे. नवे असंख्य अभ्यासक्रम हाती घेऊन नवीन संधी आणि संशोधनांमध्ये हे विद्यापीठ वेगाने पुढे येत आहे. प्रशासकीय कामांत विनाविलंबता आणि पारदर्शकता जाणवते आहे. शिस्त, तत्परता, वेळेचा उपयोग, कार्यभाव यांना वेग लाभलेला आहे.

विद्यापीठाचे उद्याचे प्रगती पुस्तक उज्ज्वल 
महत्त्वाची तसेच प्रेरक गोष्ट अशी की, कोवीडच्या काळात आॅनलाईन पद्धतीने कोणतेही महत्त्वाचे निर्णय किंवा कामे न थांबता सर्वप्रकारची खबरदारी घेत विद्यापीठ पूर्ण करताना दिसते. विद्यार्थी आणि शिक्षण हा तर आपला प्राण आहेच, पण त्यासोबतच संशोधन व विकास हापण आपला ध्यास आहे. याकडे कुलगुरुंनी सातत्याने लक्ष दिलेले. त्यामुळे शैक्षणिक उत्कर्षांचा, पायाभूत विकासाचा, तसेच योजना आणि प्रकल्पांचा आणि अध्यापन-संशोधनांचा नवा अध्याय या विद्यापीठाने अंगिकारलेला आहे. यांचे सर्व श्रेय अर्थात, कुलगुरु आणि त्यांची सर्व सहकारी टीम यांना अवश्य द्यायला हवी. यात शिक्षण परिवर्तनाचा खरा अर्थ सामावलेला आहे. शिवाय, नव्या शैक्षणिक धोरणांचा समग्र विचार करत आणि सुसंवाद हा शिक्षणाचा मूलमंत्र आहे, हे ओळखत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उत्कर्षांकडे प्रवास करत आहे, हे खरे. कुलगुरु महोदय सतत विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतात. त्यांना छान वेळ देतात. संचालक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांच्याशी विविध बैठका-समित्यांच्या माध्यमांतून संवाद साधतात. उपक्रम-प्रकल्प हाती घेतात. विविध प्राधिकरणांच्या सहकार्याने कार्याला वेगही देतात. सतत कार्यमग्नता आणि कार्याचा पाठपुरावा  ही कुलगुरु यांची कार्यशैली नजरेत भरावी, अशा प्रकारची आहे. त्यामुळेच, या विद्यापीठाचे उद्याचे प्रगती पुस्तक उज्ज्वल आणि देदीप्य असेल, यासंबंधी खात्री वाटते. 

हेही वाचलेच पाहिजे - परभणी : कांदा निर्यात धोरणाला जिल्ह्यात विरोध, संघटना, शेतकरी आक्रमक 

शोधक्रांती व ज्ञानविकास ही विद्यापीठांची ओळख 
शोधक्रांती व ज्ञानविकास ही विद्यापीठांची ओळख असते. त्यामुळे विद्यापीठे केवळ इमारतींवरून तोलता येत नसतात. जागा आणि उंची यावरून विद्यापीठे मोजता येणारी नसतात. यासोबतच, कुलगुरुंची दिशा, प्रकल्पांच्या उभारण्या, एकंदर विद्यार्थिकल्याणांचे शिक्षण आणि सामाजिक स्वरुपाचे विद्यापीठांचे उत्तरदायित्व, अभ्यासक्रम आणि संशोधनाची गुणवत्ता, समोरच्या वर्तमानाचे चिंतन आणि भविष्याच्या दिशांचे सूचन, ज्ञानदाते शिक्षक आणि अधिकाऱ्यांची कार्यशक्ती आणि कौशल्ये हे सगळे आणि इतर विविध विषय हे विद्यापीठांच्या एकूण यशांवर सोन्याचा कळस चढविणारे असतात. आणि म्हणूनच या विषयांची अमलबजावणी तसेच या विषयांना धरूनच आपल्या भूभागात, आपल्या एकूण समाजसंस्कृतीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कार्य करते आहे, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. ज्याला आपण सर्वस्वाने कायापालट म्हणूया, असा कायापालट पुढच्या काही वर्षांतच ह्या विद्यापीठाचा दिसेल, याची मला पूर्णतः खात्री वाटते. भरीव स्वरूपाच्या शैक्षणिक स्तरावर उंचावलेली दिसेल, हे या विद्यापीठाचे आजचे वाटचाल चित्र बघताना अगदी ध्यानात येते. या विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा...

(लेखक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख आहेत)

loading image