शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी : वैयक्तीक घटकांना मिळणार पूर्वसमंती

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 16 September 2020

नानाजी देशमुख कृषी संजीवणी प्रकल्प : ‘कोवीड’मुळे बंद होती पूर्वसमंती

नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या निर्देशानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवणी प्रकल्पातंर्गत (पोकरा) वैयक्तीक लाभाच्या घटकांना पुर्वसंमती स्थगीत करण्यात आली होती. यानंतर शेतीशाळा आणि बिजोत्पादन या घटकांना पुर्वसंमती देण्यात आली. यानंतर कृषी मंत्र्यांच्या आढावा बैठकीतील निर्देशानुसार वैयक्तीक लाभाच्या घटकांच्या पुर्वसंमतीची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी पत्राव्दारे सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना सोमवारी (ता. १४) दिले आहेत. यामुळे प्रकल्पातंर्गत गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

नानाजी देशमुख कृषी संजिवणी प्रकल्पाची अंमलबजाणी राज्यातील १५ जिल्ह्यामधील पाच हजार १४२ गावात सहा वर्षाच्या कालावधीत (२०१८-१९ ते २०२३-२४ पर्यंत) राबविण्यात येत आहे. प्रकल्पाचे सर्वांगीण उदिष्ट्य गाठण्याच्या दृष्टीने प्रकल्पातील सर्व घटक राबविण्यास असलेला वाव विचारात घेवून सर्व गावसमुहामध्ये प्रकल्प घटकांची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे. दरम्यान कोवीड - १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार प्रकल्पातंर्गत वैयक्तीक लाभाच्या घटकांना पुर्वसंमती स्थगित करण्यात आली होती. यानंतर ता. २० ऑगस्ट पासून शेतीशाळा आणि बिजोत्पादन या दोन घटकांसाठी पुर्वसंमती देण्याचे कार्यवाही सुरु करण्यात आली. यानंतर कृषी मंत्री दादा भुसे यांनी नुकतीच जिल्ह्यांच्या प्रकल्प आढावा बैठकीत वैयक्तीक घटकांच्या पुर्वसंमतीची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचाधक्कादायक : नांदेड जिल्ह्यातील ‘हा’ पाझर तलाव फुटून शेकडो हेक्टर शेती गेली खरडून

वैयक्तीक घटकात यात मात्र शेळीपालन बाब स्थगित

त्यानुसार प्रकल्पातंर्गत वैयक्ती लाभाच्या घटकांच्या अंमलबजावणीबाबत प्रकल्प गावातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जावर मार्गदर्शक सुचनानुसार घटकनिहाय कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी सोमवारी (ता. १४) सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यात २०१९-२० साठीचा शिल्लक लक्षांक आणि २०२०-२१ चा लक्षांक एकत्रीत करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. वैयक्तीक घटकात यात मात्र शेळीपालन बाब स्थगित असल्याने या बाबीचे अर्ज लाभार्थ्यांनाकडे परत करण्याचे सुचना दिल्या आहेत.

या घटकांना मिळणार पुर्वसंमती

फळबाग लागवड, वृक्ष लागवड व बांबू लागवड, गांडूळ खत उत्पादन युनिट, नाडेप कंपोष्ट उत्पादन युनिट, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट, वैयक्तीक शेततळे (सर्व प्रकारचे) व शेततळे अस्तरीकरण, खारपाण पट्यातील गावांमध्ये वैयक्तीक शेततळे (सर्व प्रकारचे), विहीरीचे पुनर्भरण, ठिबक व तुषार सिंचन संच, हवामान अनुकुल वाणांचे पायाभुत व प्रमाणित बियाण्यांचे बीजोत्पादन करणे, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, शेडनेट हाऊसमधील भाजीपाला व फुलपिकांचे लागवड साहित्य, परसबागेतील कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुकक्षीका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, पंपसंच, पाइप व यांत्रिकीकरण, नवीन विहीर घेणे या बाबींचा समावेश आहे.

येथे क्लिक करा - नैसर्गिक वीज पडून शेतकरी ठार तर दोघे गंभीर -

‘पोकरा’तंर्गत वैयक्तीक घटकांना मंजूरी बंद केल्यामुळे आम्हाला योजनेचा लाभ मिळत नव्हता. आता लाभ मिळेल, असे कळाल्यामुळे समाधान वाटत आहे.
- माधव वडजे, शेतकरी, उंद्री (पदे) ता. मुखेड जि. नांदेड.

वैयक्तीक घटकातंर्गत ज्यांनी अर्ज केले आहेत, अशांना कृषी ग्राम समितीच्या मंजूरीनंतर पुर्वसंमती देण्यात येइल. यावेळी काही घटकात लक्षांकानुसार घटकांना मंजूरी देण्यात येणार आहे. मागील लक्षांक व चालू वर्षाचे लक्षांक यामुळे वैयक्तीक घटकांना लाभ मिळेल.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for farmers: Individuals will get pre-approval nanded news