बेमोसमी पावसाचा कहर... जनजीवन विस्कळित

wai 3.jpg
wai 3.jpg


वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) ः माहूर तालुक्यातील वाई बाजार मंडळात (ता. सात) गुरुवारी रात्री दहा ते अकरा वाजताच्या सुमारास हवामानात अचानकपणे बदल होऊन सुसाट वारा, विजांचा प्रचंड कडकडाटांत अवकाळी पावसाला सुरवात झाली. सलग अर्धा तास धोधो कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यातील दुर्गम खेडेगावांतील घरांवरील टीनपत्रे उडून गेल्याने कच्च्या घरांची पडझड झाली. वाऱ्याच्या अतिवेगामुळे विद्युत खांब आडवे झाल्याने विद्युत पुरवठा रात्रीपासून खंडित होऊन जनजीवन विस्कळित झाले आहे. तर काढणीला आलेल्या रब्बी ज्वारीसह डाळिंब, मोसंबी, आंबा या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहेत.

मुसळधार पावसाची नोंद २७ मिलिमीटर 
अशात घरातील लॉकडाउनच्या संकट काळासाठी जेमतेम साठवून ठेवलेले अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजल्याने दीड महिन्यापासून घरात बंदिस्त असलेल्या गरीब कुटुंबांचा संसार बेमोसमी पावसाच्या निमित्ताने उघड्यावर आला आहे. वाई बाजार येथील महसूल मंडळात कार्यान्वित असलेल्या पर्जन्यमापन केंद्रावर रात्री बरसलेल्या मुसळधार पावसाची नोंद २७ मिलिमीटर इतकी झाल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. पावसाबरोबर सुसाट वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की, मच्छिंद्र पार्डी येथील विद्युतपुरवठा करणारे खांब आडवे पडले, तर सहा एलईडी बल्बांचे झुंबर असलेल्या एकाच खांबात संपूर्ण गावात विद्युतरोषणाई करणारे अत्याधुनिक हायमासचे खांब बुडातून उखडून पडले आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी; फळबागांचे मोठे नुकसान
सध्या कोरोनाचे संकट घोंगावत असताना माहूर तालुक्यातील वाई बाजार, अमीनगुडा, रूपला नाईक तांडा, गोकुळ गोंडेगाव व मलकागुडा व परिसर भागात अवकाळी पावसाने अवेळी हजेरी लावल्याने काढणीअभावी शेतात उभे असलेल्या रब्बी हंगामातील ज्वारीचे आडवे पडून नुकसान झाले. गोकुळ येथील अनसूयाबाई विठ्ठलराव डाखोरे यांच्या सत्तर आर क्षेत्रांमधील ४०० डाळिंबाच्या झाडाला पैकी जवळपास १३० झाडे बुडातून तुटून पडल्याने या फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे.


रात्री दहा वाजताच्या सुमारास माहूर तालुक्यात सुसाट वाऱ्यासोबत विजांच्या कडकडाटांत बेमोसमी पाऊस बरसला. बदललेल्या हवामानाची तीव्रता पाहून रात्रीला तालुक्यातील चार महसूल मंडळांतील तलाठी व मंडळ अधिकारी यांना सज्जावरील आर्थिक व जीवित नुकसान आणि रब्बी हंगामातील पीक परिस्थितीसंदर्भात आद्यावत माहिती घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- सिद्धेश्वर वरणगावकर, तहसीलदार, माहूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com