‘लक्ष्मी’च्या लग्नाकरिता ‘साईप्रसाद’ची मदत

बंडू माटाळकर | Thursday, 9 July 2020

लक्ष्मीचे आई-वडील कामानिमित्ताने शिरड येथे आले होते. यामुळे स्वतःचे त्यांना घर नाही, दुसऱ्याच्या घरात राहून काम करून पोट भरत होते. त्यांना तीन मुली, एक मुलगा आहे. लक्ष्मीचे वडील सुभाष सूर्यवंशी सुतारकाम करून पोट भरत होते; परंतु सहा महिन्यांपूर्वी सुभाष यांचे कॅन्सर या आजाराने निधन झाले. यामुळे संसार उघड्यावर पडला व जमा झालेली मायापुंजी कॅन्सरच्या आजारावर उपचाराकरिता खर्च झाली. 

निवघा बाजार, ता. हदगाव, जि. नांदेड ः येथून जवळच असलेल्या मौजे शिरड (ता. हदगाव) येथील वडिलांचे छत्र नसलेल्या लक्ष्मी सूर्यवंशी हिच्या ता. १२ जुलै रोजी होणाऱ्या लग्नाकरिता साईप्रसाद या सेवाभावी संस्थेने मंगळवारी (ता.सात) लग्नाचे साहित्य देऊन एकप्रकारे मदतीचा हात दिला आहे. या मदतीमुळे लक्ष्मी व तिच्या आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसत होते.

सुतारकाम करून पोट भरत होते
लक्ष्मीचे आई-वडील कामानिमित्ताने शिरड येथे आले होते. यामुळे स्वतःचे त्यांना घर नाही, दुसऱ्याच्या घरात राहून काम करून पोट भरत होते. त्यांना तीन मुली, एक मुलगा आहे. लक्ष्मीचे वडील सुभाष सूर्यवंशी सुतारकाम करून पोट भरत होते; परंतु सहा महिन्यांपूर्वी सुभाष यांचे कॅन्सर या आजाराने निधन झाले. यामुळे संसार उघड्यावर पडला व जमा झालेली मायापुंजी कॅन्सरच्या आजारावर उपचाराकरिता खर्च झाली. 

हेही वाचा -  कोरोना योद्घांना हवी विश्रांती... 

रोजमजुरी करून संसार चालवला
उत्पन्नाचे काही साधन नाही, लक्ष्मीच्या आईने रोजमजुरी करून संसार चालवत असताना लक्ष्मी उपवर झाली. ती दिसायला सुंदर असल्याने येवली (ता. हदगाव) येथील पाहुण्यांनी मागणी घातली आणि संबंध जुळले. लक्ष्मीच्या आईसमोर लग्न कसे करावे असा प्रश्न निर्माण झाला. तिला कोणाच्या तरी मदतीची गरज होती. ही बाब बालाजी फाळके यांनी ‘साईप्रसाद’चे स्वयंसेवक रामेश्वर बोरकर यांना कळवली. 

तेव्हा ‘साईप्रसाद’ला मदतीची मागणी केली, लगेच घरपोच लग्नाचे साहित्य व धान्य लक्ष्मीला देण्यात आले. यावेळी लग्नाचे साहित्य बघून लक्ष्मी व तिची आई भारावून गेल्या. ‘साईप्रसाद’बरोबर गणेश शिंदे, तान्हाजी बोरकर, बालाजी फाळके, संदीप देशमुख, पंजाब वरोडे, विश्वास कृष्णपुरे, साईनाथ लीडरकर, काशीनाथ स्वामी, प्रभाकर दहिभाते यांनीही आपल्या परीने आर्थिक मदत केली.

संपादन - स्वप्निल गायकवाड