Daru.jpg
Daru.jpg

‘या’ ठिकाणी घरपोच दारू विक्रीमुळे बनावट दारूची वाहतूक


वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) ः कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने काही अटींच्या अधीन राहून दारूची घरपोच विक्री करण्याची योजना आखली आहे. अशा स्वरूपाचे आदेश देखील निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने देखील वाईन शॉपी व बिअर शॉपीच्या माध्यमातून ऑनलाइन दारू विक्रीला संमती दिली आहे. परंतु सदर आदेश जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थिती नुसार परवानाधारक दारू विक्रेत्यांना मारक तर विदर्भ, तेलंगणा सीमावर्ती भागातून बेकायदा बनावट दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांसाठी नामी संधी ठरणारे आहे.

राज्यात सोशल डिस्टेंसच्या सर्रास होत असलेल्या पायमल्लीमुळे शासनाने परवानाधारक दारूविक्री दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. तथापी राज्यात कोरोनाव्हायरस संक्रमणात तेजीत वाढ होत आहे. आणि अशात लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक अवस्था डबघाईस आल्याने राज्यशासनाच्या संमतीनंतर जिल्हा प्रशासनाने वाईन शॉप, बिअर शॉपी दारू दुकाने चालू करून ऑनलाइन घरपोच सेवा देण्याचे आदेश शुक्रवारी (ता.१५) निर्गमित केले. परंतु हे आदेश जिल्ह्याच्या विदर्भ, तेलंगणा व इतर राज्याच्या सीमावर्ती भौगोलिक परिस्थितीनुसार परवानाधारक दारु विक्रेत्यांसाठी उपयोग शून्य ठरत आहे. कारण घरपोच दारू विक्रीसाठी केवळ वाईनशॉप आणि बिअर शॉपी धारकांना परवानगी आहे. परंतु असे साधारण जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतक्या संख्या पेक्षाही अल्प असल्याकारणाने विदर्भ व तेलंगणा राज्यातून येणाऱ्या बेकायदा विदेशी व बनावट दारू विक्रीला करणाऱ्यांना सुगीचे दिवस ही संकल्पना वरकरणी पाहता गैर नाही.

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातून पैनगंगा नदी मार्गे तर तेलंगणा राज्यातील जंगलव्याप्त आडरस्त्यातून दुचाकी वाहनांवर हजार रुपये किमतीचे विदेशी मद्याचे बॉक्स सहजरीत्या जिल्ह्यातील माहूर आणि किनवट तालुक्यातील अधिकांश भागात बिनदिक्कतपणे पुरवठा होत आहेत. या मुळे परवानाधारक बार व देशी दारू दुकान चालकांना नवीन नियमातील अटी व शर्ती मुळे दाताचे पाणी पित बसण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. तर जिल्हा प्रशासनाच्या या आदेशामुळे शासनाच्या उत्पन्नात वाढ होईल असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी देशी दारू दुकान व बार परवानाधारकांना परवानगी नाकारल्यानंतर उत्पन्न वाढणार का? जिल्हाधिकाऱ्यांचे किंबहुना महाराष्ट्र शासनाचे दारू विक्री संदर्भातील ते आदेश म्हणजे गोठ्यात बांधल्या ‘भाकड गाई’ प्रमाणे असल्याची चर्चा गावरान अर्थतज्ञ कडून केली जात आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला पायदळी तुडवत बेसुमार बेकायदा बनावट व ‘तेलंगणा सेल ओन्ली’चा शिक्का असलेली दारूविक्री करणाऱ्यांचे चांगभले होणार यात तिळमात्र शंका नाही.

नामांकित कंपन्यांच्या लेबल खाली ‘बनावट दारू’
विदर्भ आणि तेलंगणा राज्यातील नांदेड जिल्ह्याचे सीमावर्तीत क्षेत्रात बनावट दारू निर्मितीचे कारखाने असण्याच्या शक्यतेला प्रचंड वाव आहे. लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या ‘ड्राय डे’ मुळे विदेशी दारूचे भाव गगनाला भिडले तुटवडा मात्र कधीच पडला नाही. दोनशे रुपयाला मिळणारे १८० एम.एलची कॉटर ५०० रुपयापर्यंत विकली जात आहे. तर नामांकित ब्रँड असलेकी व्हिस्कीचे बरणे दोन अंकी संख्या अधिक तीन शून्य इतक्या किमतीत मद्यपींना उपलब्ध केले जात आहे. त्यातही नामांकित कंपनीचे लेबल असलेल्या बाटलीत चव मात्र ‘पांढऱ्या चपटी’ची येत असल्याचे स्मार्ट तळीरामांना कळून चुकत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com