esakal | संचारबंदी लागू केल्याने नांदेडकरांची जबाबदारी वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेडला कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता नांदेड शहर आणि जिल्ह्यात ता. १२ ते ता. २० जुलै पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याचे काटेकोरपणे पालन करण्याची नांदेडकरांची जबाबदारी आहे.

संचारबंदी लागू केल्याने नांदेडकरांची जबाबदारी वाढली

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - शहर आणि जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शनिवारी सायंकाळपर्यंत ५६९ झाला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे आत्तापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ता. १२ जुलै ते ता. २० जुलैपर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉकडाउन हा प्रशासनासाठी नाही तर जनतेच्या भल्यासाठी आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यास प्रतिसाद देऊन सहकार्य करावे. जेणेकरुन आपण सर्वजण कोरोनाच्या विरुद्धची लढाई जिंकू, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला आहे.  

हेही वाचा - राज्यात प्रथमच : नांदेडात आता ‘मिशन पॉझिटिव्ह सोच’

जनतेच्या हितासाठी निर्णय
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर नागरिकांकडून कोरोना विषयक नियमावलींचे पालन होत नसल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत चालला. त्यामुळे काही नागरिकांनी लॉकडाउनची मागणी केली. त्याचबरोबर महापौर दीक्षा धबाले यांनीही मागणी केली. शेवटी जनतेच्या हितासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

प्रशासनाने केले नियोजन
लॉकडाउनच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्यासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी लॉकडाउनच्या अनुषंगाने नियोजन केले. शहर आणि जिल्ह्यात ठेवण्यात येणाऱ्या बंदोबस्ताबाबतची माहितीही पोलिस अधीक्षक मगर यांनी दिली. तसेच नांदेडला करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती आयुक्त डॉ. लहाने यांनी दिली. संचारबंदीच्या काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कामाशिवाय घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. 

कोरोनाबाबतचे गैरसमजही होणार दूर
नागरिकांच्या मनात कोरोनाबद्दल असलेली भीती दूर करणे महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविले जाणारे ‘मिशन पॉझिटिव्ह सोच’ हे अभियान जनतेच्या मनात सकारात्मक सद्भाव निर्माण करेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात ‘मिशन ब्रेक द चेन’ अंतर्गत आदेश निर्गमीत केले होते. त्यास शहर व जिल्ह्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता कोरोनाच्या जागरात सकारात्मक सहभागासाठी ‘मिशन पॉझिटिव्ह सोच’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - कोरोना इफेक्ट : शाळा सुरु करण्याबाबत शाळांची नकार घंटा

व्यापक लॉकडाउन हवा - डॉ. हंसराज वैद्य
लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर जवळपास पूर्ण व्यवहार पूर्वीसारखे झाल्याचे समजून सध्या जनता घराबाहेर बिनधास्त वावरत आहे. परिणामी नांदेडमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाउनमध्ये आस्थापना, शासकीय कार्यालये, बँका आदी पूर्णपणे बंद ठेवल्यास नागरिक रस्त्यावर येणे आपोआप बंद होईल आणि कोरोनास आपण रोखू शकू आणि नांदेड कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. हंसराज वैद्य यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर आता संचारबंदीही लागू केली आहे. जेणेकरुन कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. 

loading image
go to top