नांदेड : महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे २२ एप्रिलला लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार अमर राजूरकर

नांदेड : महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे २२ एप्रिलला लोकार्पण

नांदेड : कौठा येथे उभारण्यात आलेल्या जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा ता.२२ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता लोकार्पण सोहळा होणार आहे. या सोहळ्यास पालकमंत्री अशोक चव्हाण व केदार जगदज्योती भीमाशंकरलिंग महाराज स्वामी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती विधान परिषद गटनेते आमदार अमर राजूरकर यांनी रविवारी (ता.१७) पत्रकार परिषदेत दिली.

आमदार राजूरकर म्हणाले की, निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कॉंग्रेसने महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे वचन दिले होते. पुतळा उभारण्यास थोडा विलंब झाला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाची नियमावली, जागेची अडचण आणि समाजाच्या भावना या तिन्ही बाबींच्या कसोटीवर उतरून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लिंगायत समाजाला दिलेले वचन पूर्ण केले. नांदेड शहर हे युनिक शहर आहे. पालकमंत्र्यांकडून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न असतो. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्याचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे, असे माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी सांगितले.

स्थायी समिती सभापती किशोर स्वामी म्हणाले की, तत्कालीन महापौर शैलजा स्वामी यांनी सर्वसाधारण सभेत पुतळा निर्मितीचा पहिला प्रस्ताव सादर केला. तो ता.२४ डिसेंबर २०१२ रोजी मंजूर झाला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात माजीमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, दिवंगत नेते माधवराव पांडागळे, मनोहर धोंडे, अविनाश भोसीकर, राजेंद्र हुरणे, संजय बेळगे, बालाजीराव पांडागळे, संतोष पांडागळे आदींसह अनेकांनी पुतळा निर्मितीसाठी सहकार्य केले. मी सभापती असताना या पुतळ्याचे लोकार्पण होत आहे, याचा मला आनंद होत असल्याचेही श्री. स्वामी यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला माजी मंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, महिला बालकल्याण सभापती अपर्णा नेरलकर, मनपा आयुक्त डाॅ. सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, माजी सभापती संजय बेळगे, काँग्रेस प्रवक्ता संतोष पांडागळे आदी उपस्थित होते. बारा फुट उंचीचा हा पुतळा असून पुतळ्याची किंमत ४३.६८ लक्ष तर एक कोटी ५२ लक्ष रुपये सुशोभिकरणावरील खर्च आहे, असे सभापती किशोर स्वामी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Inauguration Statue Of Mahatma Basaveshwar On 22nd April Ashok Chavan Kedar Jagadguru Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..