नांदेडला मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष
जुन्या नांदेडातील इतवारा येथील आठवडी बाजारात संजय दुर्गादास देशमुख (वय ५२, रा. सिद्धनाथपुरी) हे डॉ. देशमुख हॉस्पीटल ते हनुमान मंदिर या भागात रविवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास भाजीपाला खरेदी करत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन एकाने त्यांना धक्का देऊन त्यांच्या शर्टाच्या खिशातील दहा हजार आठशे रुपयांचा मोबाईल चोरून नेला.
नांदेड - नांदेड शहर आणि परिसरात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. विशेष करून आठवडी बाजार, बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीला जाण्याची संख्या वाढली आहे. पोलिस ठाण्यात फक्त तक्रार दाखल करून घेण्यापलीकडे फारशी काही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लक्ष घालून मोबाईल चोरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जुन्या नांदेडातील इतवारा येथील आठवडी बाजारात संजय दुर्गादास देशमुख (वय ५२, रा. सिद्धनाथपुरी) हे डॉ. देशमुख हॉस्पीटल ते हनुमान मंदिर या भागात रविवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास भाजीपाला खरेदी करत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन एकाने त्यांना धक्का देऊन त्यांच्या शर्टाच्या खिशातील दहा हजार आठशे रुपयांचा मोबाईल चोरून नेला. याबाबत इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस नायक पल्लेवाड पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - नांदेड : आयपीएलवर सट्टेबाजी, पाच जणांना अटक
नांदेड बसस्थानकातून मोबाईल चोरीला
नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी (ता. १८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धम्मदीप लक्ष्मण गडपाळे (वय ३१, रा. पालीनगर, नांदेड) हे परभणीच्या बसमध्ये चढत होते. त्यावेळी त्यांच्या पॅन्टीच्या खिशातील दहा हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस जमादार शेख पुढील तपास करत आहेत.
खंजर बाळगणाऱ्यास अटक
नांदेड शहरातील इतवारा भागात बाबा व्हेजिटेबल मार्केटच्या कमानीसमोर वाटमारी रस्त्यावर एकजण विना परवाना आणि बेकायदेशिररित्या लोखंडी धारदार शस्त्र खंजर ताब्यात बाळगलेला मिळून आला. ही घटना शनिवारी (ता. १७) रात्री पावणेबाराच्या दरम्यान घडली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत पोलिस नायक विठ्ठल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नायक पवार करत आहेत.
चार हजाराची दारू शिळवणीत जप्त
नांदेड ः शिळवणी (ता. देगलूर) येथे मरखेल पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विना परवाना आणि बेकायदेशिररित्या चार हजार रुपयांची गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. त्यांनी ती चोरटी विक्री करण्याच्या उदेशाने बाळगली होती. याबाबत पोलिस जमादार मोहन कनकवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस जमादार कदम करत आहेत.
झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
नांदेड ः जांबळी (ता. मुखेड) येथील संदीप मारोतराव राठोड (वय २३) या तरूणाने जांबळी शिवारातील त्याच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील घटना रविवारी (ता. १८) सकाळी आठ वाजता उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसून याबाबत माधव राठोड (वय ४०) यांनी दिलेल्या माहितीवरून मुखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महिला फौजदार इटुबोने करत आहेत.
हेही वाचलेच पाहिजे - पीकविमा कंपनीचे कार्यालय तालुकास्तरावर सुरू करा- खासदार हेमंत पाटील
पाच हजाराची दारू जप्त
नांदेड ः उमरी वाडी बायपास रस्त्याजवळ पोलिसांनी एकाला रविवारी (ता. १८) सायंकाळी सहा वाजता चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या चार हजार ९९३ रुपयांची देशी दारू सापडली. चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने त्याने ती जवळ बाळगली होती. दारू जप्त करण्यात आली असून याबाबत त्याच्याविरूद्ध उमरी पोलिस ठाण्यात पोलिस जमादार संजय गवलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस जमादार गवलवाड करत आहेत.
तामसात अवैध दारू बाळगणाऱ्यास अटक
नांदेड ः तामसा (ता. हदगाव) येथे रविवारी (ता. १८) दुपारी दोनच्या सुमारास कापड दुकानासमोर एका व्यक्तीकडे एक हजार आठशे रुपयांची देशी दारू आढळून आली. त्याने ती बेकायदेशिररित्या आणि विना परवाना चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगली होती. याबाबत पोलिस शिपाई शहाजी जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार डुडुळे करत आहेत.