आंतरजिल्हा बदल्या पोकळ बिंदुवर कराव्यात- पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना

प्रल्हाद कांबळे | Monday, 17 August 2020

शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या पुढील बदली टप्प्यात पोकळ बिंदूवर होण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

नांदेड : राज्यातील एखाद्या जिल्ह्यात बिंदू नामावलीनुसार रिक्त नसलेल्या प्रवर्गातील शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या पुढील बदली टप्प्यात पोकळ बिंदूवर होण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईन असे आश्वासन मुश्रीफ यांनी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळास दिले.

संघटनेने दिलेल्या निवेदनात सन 2010 व 2011 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत काही जिल्ह्यांत बिंदूनामावलीनुसार वस्तुनिष्ठता न तपासता प्रत्यक्षात रिक्त नसणाऱ्या प्रवर्गाची भरती झाली. सन 2013-14 मध्ये आर.टी.ई. अॅक्ट निकषांनुसार अतिरिक्त ठरलेल्या अनेक मुख्याध्यापकांना अध्यापक पदावर पदावनत करण्यात आले. वस्तीशाळा शिक्षकांना रिक्त नसलेल्या प्रवर्गाच्या पोकळ बिंदूवर सामावून घेतले. इत्यादी कारणांमुळे सन 2015 नंतर झालेल्या बिंदू नामावली पडताळणीमध्ये काही जिल्ह्यात एखादा प्रवर्गाची पदे खूपच अतिरिक्त ठरली आहेत. खरे तर वरील सर्व कारणे ही पूर्णतः प्रशासकीय बाब असल्याने त्यामध्ये बदलीपात्र शिक्षकांचा कोणताही दोष नसताना निव्वळ रिक्त पदांच्या अभावी त्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीपासून वंचित रहावे लागत आहे.

हेही वाचा विष्णुपूरी प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करा- खासदार हेमंत पाटील

10 टक्के रिक्त पदांची अट रद्द करावी
         
ता. एक मार्चच्या शासन निर्णयानुसार वस्तीशाळा शिक्षकांप्रमाणे पोकळ बिंदुवर तात्पुरते सामावून घेण्याचा जसा धोरणात्मक निर्णय झाला तसा धोरणात्मक निर्णय आंतरजिल्हा बदलीच्या पुढील टप्प्याबाबत घेण्यात यावा. बदली साठी असलेली 10 टक्के रिक्त पदांची अट रद्द करावी. तसेच दिनांक ता. १० आॅगस्ट २०२० रोजी झालेल्या आपसी, साखळी बदलीचा रोस्टरवर कोणताही परिणाम होत नसल्याने अशी बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना द्यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

शिष्टमंडळात यांचा होता सहभाग

अशी माहिती राज्यसरचिटणिस हरीश ससनकर, राज्यकोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, नांदेडचे जिल्हाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, जिल्हाप्रसिध्दीप्रमुख एस. एस. पाटील आणि सुरेश मोकले यांनी दिली.