
Nanded : पर्यटनाला चालना दिल्यास युवकांना काम; गडकरींकडे हेमंत पाटील यांची मागणी
नांदेड : श्री क्षेत्र माहूर गडावर श्री रेणुका मातेचे पुरातन देवस्थान आहे. प्रभू रामचंद्र या देवस्थानास भेट देऊन गेल्याचा रामायणात उल्लेख देखील आहे. हा भाग मुंबई - पुणे शहरापासून बारा ते चौदा तासाच्या अंतरावर असल्याने इथल्या शिक्षित युवकांना मुंबई - पुणे सारख्या शहरात गेल्याशिवाय रोजगार मिळत नाही.
माहूर गडावर धार्मिक पर्यटनास चालना मिळाल्यास हजारो युवकांच्या हाताला रोजगार मिळू शकतो. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (ता.२०) माहूर गडावरील लिफ्टसह - स्कायवाँक भूमीपूजन समारंभ पार पडला. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी ही मागणी केली.
श्री. पाटील म्हणाले की, रस्ते, महामार्गाच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी या देशाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले आहे. माहूर गड, दत्तशिखर, रेणुकामाता, रायबागीन यांनी राज्य केलेला किल्ला हे रोप वे (केबल कार) च्या माध्यमातून जोडले गेले पाहिजेत, अशी माहूरवासियांची अपेक्षा आहे.
या भागातील शेती, शेतकरी आणि युवक यांना स्वयंरोजगाराच्या कक्षेत आणण्यासाठी पर्यटन, कृषी पर्यटन व इतर शेतीपुरक उद्योगाशिवाय पर्याय राहिलेला नाही. या दृष्टीने सर्वच पातळ्यांवर एकत्रीत विचारविनिमय होऊन सामुहिक कृतीची आवश्यकता आहे. माहूर हा खनिज संपत्ती असलेला तालुका आहे.
या भागात गंधकाचे मोठे साठे आहेत. मातृतीर्थ, उनकेश्वर असे अनेक लहान मोठी ऐतिहासिक मंदीरे असल्याने या भागात धार्मिक पर्यटनस्थळास चालना देण्यासाठी पुढाकार घेतल्यास स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार प्राप्त होईल, अशी अपेक्षा खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास आमदार भीमराव केराम, राम पाटील रातोळीकर, डॉ. तुषार राठोड, शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदी उपस्थित होते.