करखेलीचा प्रमोद करतोय हायटेक शेती

सुरेश घाळे
Wednesday, 23 September 2020


नोकरीपेक्षा शेती कधीही उत्तम हे करखेलीच्या भोजराम करखेलीकर यांचे विचार असून, याच विचाराने आपल्या मुलाला शेतीचे महत्त्व पटवून शेती करण्याचा सल्ला दिला. आज त्यांचा मुलगा प्रमोद करखेलीकर हा शेतीतून लाखांचे उत्पन्न कमावतोय. प्रमोदने स्वतः शेतीत हळद व अद्रकची लागवड केली. हळद व अद्रक जोमात आली असून, नांदेड जिल्ह्यात असे पीक आले नसल्याचे इतर शेतकरी सांगतात. पीक जोमात व चांगले आले असल्याने अनेक शेतकऱ्यांनी प्रमोदकडे हळद व अद्रकची बेणं म्हणून मागणी केली आहे. वाढत्या मागणीमुळे बेणं म्हणूनच हळद व अद्रक उपयोगात आणणार असल्याचे प्रमोद करखेलीकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले आहे. 
 

धर्माबाद, (जि. नांदेड) : नोकरीपेक्षा शेती कधीही उत्तम हे करखेलीच्या भोजराम करखेलीकर यांचे विचार असून, याच विचाराने आपल्या मुलाला शेतीचे महत्त्व पटवून शेती करण्याचा सल्ला दिला. आज त्यांचा मुलगा प्रमोद करखेलीकर हा शेतीतून लाखांचे उत्पन्न कमावतोय. प्रमोदने स्वतः शेतीत हळद व अद्रकची लागवड केली. हळद व अद्रक जोमात आली असून, नांदेड जिल्ह्यात असे पीक आले नसल्याचे इतर शेतकरी सांगतात. पीक जोमात व चांगले आले असल्याने अनेक शेतकऱ्यांनी प्रमोदकडे हळद व अद्रकची बेणं म्हणून मागणी केली आहे. वाढत्या मागणीमुळे बेणं म्हणूनच हळद व अद्रक उपयोगात आणणार असल्याचे प्रमोद करखेलीकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले आहे. 

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत ९९.४४ टक्के पावसाची नोंद
 

टोमॅटोसह इतर पिकांचेही नियोजन 
करखेलीचा उच्चशिक्षित तरुण प्रमोद करखेलीकर याने २०१५ मध्ये नागपूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर नोकरी न करता २०१६ पासून शेती करण्यास सुरवात केली. प्रमोद यांना ४० एकर शेती आहे. त्यापैकी २० एकर त्यांनी दुसऱ्याला शेती खंड (बटाव) देतात. उर्वरित २० एकर शेती ते स्वतः करतात. यामध्ये साधारणपणे साडेतीन एकर हळद, सव्वाएकर अद्रक, दोन एकर स्वीट मक्का, एक एकर आवारशेंगा, तीन एकर कांदा, लसुण, मिरची व उर्वरित शेतीत कोथिंबीर, वांगे, टोमॅटोसह इतर पिकांचेही नियोजन केलेले आहे. 

 

१२५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा
आंतरपीक म्हणून हळदीमध्ये मिरचीची लागवडही केली. हळद, अद्रक पिकांसाठी त्यांनी बेणे, आंतरमशागत, शेणखत, फवारणी, पीक व्यवस्थापनावर हळदीसाठी दीड लाख व अद्रकसाठी एक लाख असे एकूण अडीच लाख रुपये खर्च केले. हळद व अद्रक जोमात आहे. हळद एकरी ३५ क्विंटल, तर अद्रक एकरी १०० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे. हळदीला कमीतकमी क्विंटलला पाच हजारांचा, तर अद्रकला क्विंटलला सहा हजारांचा भाव मिळतो. साडेतीन एकरमधील हळद १२५ क्विंटल, तर सव्वा एकरमधील अद्रक १२५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा असून, यातून ६ लाख २५ हजार रुपये हळदीचे, तर साडेसात लाख अद्रकचे मिळतात. 

 

मार्गदर्शनातूनच शिकायला मिळाले 
प्रमोदला देगलूर तालुक्यातील शिवराम धुळशेट्टे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. हळद व अद्रक पीक जोमात व चांगले असल्याने अनेक शेतकऱ्यांनी प्रमोदकडे हळद व अद्रकची बेणं म्हणून मागणी केली आहे. वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन बेणं म्हणूनच हळद व अद्रक उपयोगात आणणार असल्याचे प्रमोद करखेलीकर यांनी सांगितले, त्यासाठी ९९६०७४८३७४ या मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karkheli`s Promad Enjoying High-Tech Farming, Nanded News