
दहावीची आजपासून परिक्षा
नांदेड : बारावीच्या परिक्षेप्रमाणे यंदा दहावीचीही परिक्षा बोर्डाच्या वतीने ऑफलाइन पध्दतीने मंगळवारपासून (ता. १५) घेण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील ६४५ केंद्र आणि उपकेंद्रवर ह्या परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षेसाठी ४७ हजार ४७६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. परिक्षा शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी तालुकास्तरावर विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
कोरोनाच्या गोंधळलेल्या वातावरणामुळे मागील दोन वर्षापासून दहावी, बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षातील शाळा, महाविद्यालये उशीरा सुरु झाली. यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होईल की नाही, परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन होणार? याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, परीक्षा विभागाने यंदा सर्व परिक्षा आॅफलाइन पद्धतीनेच होणार? हे स्पष्ट केल्यानंतर ता. चार मार्चपासून बारावी बोर्डाच्या परिक्षेस प्रारंभ झाला आहे. त्या पाठोपाठ विद्यार्थ्यांच्या करिअरची पहिली पायरी असलेल्या दहावीची परीक्षा मंगळवारपासून (ता.१५) सुरू होत आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने परिक्षेसाठीची तयारी पूर्ण केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्यासह शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या उपस्थितीत परिक्षेचा आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शिक्षण विभाग व संबंधीत परीक्षा केंद्रानी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांची थर्मल गनव्दारे तपासणी करावी, परीक्षा केंद्राशी तथा परिक्षेशी संबंधीत व्यक्तीशिवाय इतर व्यक्तींना परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश देवू नये. आवश्यक असलेल्या परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना केंद्रावरील नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
भरारीसह बैठ्या पथकाची नियुक्ती
दहावी बोर्डासाठी जिल्ह्यात ६४५ केंद्र असून यात १५६ मुख्य केंद्र व ४८९ उपकेंद्रांचा समावेश आहे. तर परिक्षेसाठी ४७ हजार ४७६ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी विविध पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शहरासह जिल्हास्तरावर सहा आणि तहसीलदार, बीडिओ यांच्या अधिनस्त भरारीसह बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
Web Title: Maharashtra Ssc Board Exam Begins Today Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..