मराठवाड्यातील अनेक धरणे तुडुंब भरल्याने मिटली चिंता....

अभय कुळकजाईकर
Wednesday, 9 September 2020

यंदाच्या वर्षी दमदार पाऊस झाल्याने मराठवाड्यातील अनेक लहान, मोठे प्रकल्प तुडुंब भरले असून आगामी काळातील पाण्याची चिंता मिटली आहे. दमदार पावसामुळे प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जायकवाडी धरणापासून ते नांदेड जिल्ह्यातील बळेगाव बंधाऱ्यापर्यंतचे अनेक प्रकल्प तुडुंब भरुन गेले आहेत. 

नांदेड - यंदाच्या वर्षी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे यंदा जायकवाडीपासून ते विष्णुपुरी, आमदुरा, बळेगावपर्यंतचे जवळपास सर्व प्रकल्प तुडुंब भरले आहेत. काही मोठे प्रकल्प भरल्याने त्याचे काही दरवाजेही उघडून पाण्याचाही विसर्ग करावा लागला आहे. 

ता. एक जूनपासून ते ता. नऊ सष्टेंबरपर्यंत गेल्या साडेतीन महिन्यात मराठवाड्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. त्याचबरोबर प्रकल्पांच्या वरील क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने अऩेक मोठे, लघु, मध्यम प्रकल्प तसेच कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे जवळपास भरले आहेत. त्यामुळे प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने ओढे, नदी, नाले भरुन वाहण्यासोबतच विहिरी, तलावांतही पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामाचे पिकही चांगले येण्याची शक्यता कृषि विभागाने व्यक्त केली आहे. 

हेही वाचा - नांदेडला कोरोनाचा नवा उच्चांक; बुधवारी तब्बल ४०८ पॉझिटिव्ह   दिवसभरात २४६ कोरोनामुक्त; चार जणांचा मृत्यू

सातशे दलघमी पाणी सोडले
नांदेडजवळ गोदावरी नदीवर असलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प यंदा जुलै महिन्यापासूनच भरण्यास सुरुवात झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्पात ८०.८९ दलघमी म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा सातत्याने राहिल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे यांनी दिली. आत्तापर्यंत जवळपास सातशे दलघमी पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. जायकवाडी, सिद्धेश्वर आणि येलदरी ही मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्याचबरोबर इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पही ९४.१९ टक्के भरला आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - घरासमोर कार का लावली म्हणताच केला गोळीबार, पाथरीतील घटना...
 
मराठवाड्यातील प्रकल्पात पाणीसाठा (ता. नऊ सष्टेंबरपर्यंत) 

 • प्रकल्पाचे नाव - पाणीसाठा (दलघमीमध्ये) - टक्केवारी 
 1. जायकवाडी - २,१४८ दलघमी - ९८.९५ टक्के 
 2. माजलगाव - २५९ - ८३.०१ 
 3. येलदरी - ८०९.७७ - १०० 
 4. सिध्देश्वर - ८०.९६ - १०० 
 5. अप्पर मनार - ६४.०४ - ८४.६० 
 6. लोअर मनार - १११.७८ - ८०.८८ 
 7. इसापूर युपीपी - ९०८.०७ - ९४.१९ 
 8. ढालेगाव बंधारा - १०.४५ - ७७.४१ 
 9. मुदगल बंधारा - १०.२४ - ९०.१४ 
 10. मुळी बंधारा - ०.९५ - ९.४४ 
 11. दिग्रस बंधारा - ३८.८७ - ६१.१५ 
 12. अंतेश्वर बंधारा - २१.१६ - १०० 
 13. विष्णुपुरी प्रकल्प - ८०.७९ - १०० 
 14. आमदुरा बंधारा - २३.२० - १०० 
 15. बळेगाव बंधारा - ३१.४३ - ७७.०७ 
 16. बाभळी बंधारा - ००.०० - ००.००

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many dams in Marathwada have been filled to the brim., Nanded news