esakal | आमदार अमरनाथ राजूरकर सहकुटुंब मुंबईकडे रवाना 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेनंतर प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना, मुंबईतील भाटिया रुग्णालयात होणार उपचार

आमदार अमरनाथ राजूरकर सहकुटुंब मुंबईकडे रवाना 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड - पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या आ. अमरनाथ राजूरकर यांचा कोरोना अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेच ना. अशोकराव चव्हाण यांनी आ. अमरनाथ राजुरकर व त्यांच्या कन्येला तातडीने मुंबईला हलविण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने वेगाने हालचाली करत आ. अमरनाथ राजूरकर व त्यांच्या कन्येला मंगळवारी (ता. २१) सकाळी आठ वाजता कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. 

कोरोना काळातही पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जनतेत जाऊन लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला होता. त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. त्यानंतर ना. अशोकराव चव्हाण यांनी पुन्हा लोकांमध्ये जाऊन विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. तसेच एकामागून एक बैठकांना सुरुवात केली. त्यांच्या सोबत  विधान परिषदेतील प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर हेही  सतत उपस्थित राहिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी आयोजित बैठकीला विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर हेही उपस्थित होते. आ. राजूरकर यांचा कोरोना अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. सोबत त्यांची कन्या मृग्णयी हिचा अहवालही देखील पॉझिटिव्ह आला. पण पत्नी मृणाल व मुलगा डॉ. आशुतोष यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. सर्व सामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यात सतत पुढे असलेल्या आ. राजुरकरांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच बैठकीला उपस्थित असलेले जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह सर्वच अधिकारी, पदाधिकार्यांना क्वारंटाईन करण्यात आले.

हेही वाचा -  पालकमंत्री अशोक चव्हाण या दोन आमदारांसह मुंबईला रवाना

मुंबईला पुढील उपचारासाठी रवाना

आ. अमरनाथ राजूरकर व त्यांची कन्या मृग्णयी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच त्यांच्या नांदेड शहरातील आशा हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. पण पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आ. राजूरकर व त्यांच्या कन्येला तातडीने मुंबईला हलविण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या होत्या. तसेच अमिता चव्हाण यांनी देखील राजूरकर कुटुंबियांची जातीने काळजी घेत त्यांना मुंबईला पुढील उपचारासाठी रवाना करण्यासाठी लक्ष दिले. मंगळवारी सकाळी आठ वाजता कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे आ. अमरनाथ राजूरकर त्यांची कन्या मृग्णयी यांना मुंबईला रवाना करण्यात आले. तर आ. राजूरकर यांच्या पत्नी मृणाल राजूरकर व मुलगा डॉ. आशुतोष राजूरकर हे स्वतंत्र वाहनाने मुंबईला रवाना झाले. मुंबईतील भाटिया हॉस्पीटलमध्ये आ. राजूरकर व कन्या मृग्णयी यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

loading image
go to top