नांदेड : वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरेंची अडचण मनसे वाढविणार

प्रल्हाद कांबळे
Saturday, 23 January 2021

निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, वनमंत्री, महसूलमंत्री यांच्यासह संबंधित खात्याकडे पाठविण्यात आले आहेत.

नांदेड : भोकर येथील तत्कालीन वनपरिक्षेत्राधिकारी अशिष हिवरे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे इशारावजा निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, वनमंत्री, महसूलमंत्री यांच्यासह संबंधित खात्याकडे पाठविण्यात आले आहेत.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, भोकर वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे यांनी केलेल्या कामाची व त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करुन कारवाई करावी. मनसेचे जिल्हाध्यक्ष माॅन्टीकसिंग जागीरदार यांनी व इतर सहा जणांनी ता. 19 ऑगस्ट 2019 रोजी निवेदनाच्या अनुषंगाने सबळ पुराव्या सह 10 डिसेंबर 2019 रोजी सहाय्यक उपवनसंरक्षक ( वन्यजीव व रोहयो) नांदेड यांच्या कार्यालयात देण्यात आले होते. यासंदर्भात त्यांना हजर राहण्याबाबत कळवले होते. सर्व पुरावे दाखल करुन आम्ही चौकशी करण्याची विनंती केली. 

परंतु कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे सदर प्रकरणी आजपर्यंत कारवाई झाली नाही. त्या अनुषंगाने ता. 19 जानेवारी 2019 रोजी पुन्हा निवेदन देऊन तत्काळ चौकशी करण्याची विनंती केली मात्र आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नही. सदर प्रकरणी येत्या दहा दिवसात कोणतीही कार्यवाही न झाल्यास मनसेच्यावतीने सहाय्यक उपवनसंरक्षक ( रोहयो व वन्यजीव ) कार्यालय नांदेड येथे आंदोलन करण्यात येईल.

या आंदोलनाच्या काळात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशाराही मनसेने दिला आहे. दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मॉन्टेकसिंग जागीरदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवि राठोड, शहराध्यक्ष शफी, सुभाष भंडारे, शक्तीसिंग परमार, पप्पू मनसुके, महेश ठाकूर, अनिकेत परदेशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS will aggravate the problem of forest range officer Ashish Hivre nanded news