पपई, मेथी उत्पादनातून लाखोंची मिळकत

शशिकांत धानोरकर
Sunday, 27 September 2020

गावात असून शेतात न जाणारा दिवस हा या परिवारासाठी दुर्मिळच मानला जातो. सामूहिक शेती करण्याचा सकारात्मक परिणाम म्हणून या कुटुंबीयांनी शेतातील अंदाजे दहा एकर जमिनीवर पपई, मेथी, वांगे, गवार, चवळी आदींचे भरघोस उत्पादन केले. कापसामध्ये मेथीचे आंतरपीक घेतले. सेंद्रिय खतांचा जास्त वापर करण्यामुळे मेथीचे उत्पादनही भरघोस होऊन या कुटुंबाला दोन महिन्यांत अंदाजे अडीच लाख रुपयाचे उत्पादन झाले. लुसलुशीत हिरव्यागार मेथीला खरेदी करण्यासाठी तामसा, हदगाव, भोकर, हिमायतनगर येथील व्यापाऱ्यांचा चौंडे यांच्या शेतात खरेदीसाठी राबता होता. 
 
तामसा, (ता. हदगाव, जि. नांदेड) : चिकाळा (ता. हदगाव) येथील संयुक्त कुटुंब असलेल्या चौंडे परिवारातील शेतकरी भावंडांनी सामूहिक मेहनतीतून शेतात पपई व मेथीचे लाखो रुपयांचे उत्पादन केले आहे. पाच भावंडांचा मोठा परिवार असलेले चौंडे कुटुंब आजही संयुक्त पद्धतीने जीवन जगत एकत्रित शेती वाहतात. 

अडीच लाख रुपयाचे उत्पादन
गावात असून शेतात न जाणारा दिवस हा या परिवारासाठी दुर्मिळच मानला जातो. सामूहिक शेती करण्याचा सकारात्मक परिणाम म्हणून या कुटुंबीयांनी शेतातील अंदाजे दहा एकर जमिनीवर पपई, मेथी, वांगे, गवार, चवळी आदींचे भरघोस उत्पादन केले. कापसामध्ये मेथीचे आंतरपीक घेतले. सेंद्रिय खतांचा जास्त वापर करण्यामुळे मेथीचे उत्पादनही भरघोस होऊन या कुटुंबाला दोन महिन्यांत अंदाजे अडीच लाख रुपयाचे उत्पादन झाले. लुसलुशीत हिरव्यागार मेथीला खरेदी करण्यासाठी तामसा, हदगाव, भोकर, हिमायतनगर येथील व्यापाऱ्यांचा चौंडे यांच्या शेतात खरेदीसाठी राबता होता. 

हेही वाचा -  स्वारातीम विद्यापीठातील कामकाज ठप्प, राज्यव्यापी आंदोलनास वाढता पाठिंबा

पपई थेट राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब येथपर्यंत पोचली
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात शेतातील तीन एकरांमध्ये बाबूराव चोंडे यांच्या पुढाकारातून चौंडे कुटुंबीयांनी तायवान या पपईच्या वाणाची लागवड केली. सर्व प्रकारची व्यवस्थित काळजी घेण्यामुळे लागवड केलेल्या अंदाजे तीन हजार पपईच्या रोपांची व्यवस्थित वाढ झाली. तीन महिन्यांपासून शेतातील पपईला चांगली मागणी सुरू झाली. पपईच्या एका झाडाला दीडशे ते दोनशे पपईचा जोरदार बहार येऊन विकसित झाली. मालेगाव, पुसद येथील व्यापाऱ्यांच्या माध्यमातून चौंडे यांची पपई थेट राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब येथपर्यंत पोचली. 

मिळकतही चांगली 
पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक शेती करण्यामुळे निसर्गाच्या अनुकूल व प्रतिकूल अवस्थेत यशस्वी शेती शक्य होते, हा अनुभव आम्हाला येत आहे. करणाऱ्याची व कसणाऱ्याची शेती असते, हेच शेतीच्या बाबतीत अंतिम सत्य आहे. असे बाबूराव चौंडे, प्रयोगशील शेतकरी, चिकाळा, यांनी सांगितले. तसेच शेतात तायवान पपईचा प्रयोग पहिल्यांदाच यशस्वी झाला. लॉकडाउनमुळे पपई विक्रीबाबतची भीती होती; पण नैसर्गिक साथ मिळत पपई व मेथीचे चांगले उत्पादन होऊन मिळकतही चांगली पदरात पडल्याचे तातेराव चौंडे, शेतकरी, चिकाळा यांनी सांगितले.

संपादन - स्वप्निल गायकवाड 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More Rupees From Papaya Production, Nanded News