सासूला सोडवायला गेलेल्या सुनेचा सासऱ्याने केला खुन

प्रभाकर लखपत्रेवार | Thursday, 20 August 2020

सुनेच्या मृत्यूस कारणीभूत असलेला सासरा मात्र फरार झाला आहे.  मयत महिलेच्या अंत्यविधीनंतर गुन्हा नोद करणयात येणार असल्याची माहिती कुंटूर पोलीसांनी दिली. 

नायगाव (जिल्हा नांदेड) : सासूला मारहाण होत असल्याने भांडण सोडवायला गेलेल्या सुनेवरच सासऱ्याने जोरदार हल्ला करुन रकबंबाळ केल्याची घटना तालुक्यातील देगाव येथे बुधवारी (ता. १९) रोजी घडली. मात्र उपचार चालू असतांना बुधवारी रात्री मृत्यु झाला  असून. सुनेच्या मृत्यूस कारणीभूत असलेला सासरा मात्र फरार झाला आहे. मयत महिलेच्या अंत्यविधीनंतर गुन्हा नोद करण्यात येणार असल्याची माहिती कुंटूर पोलीसांनी दिली. 

नायगाव तालुक्यातील देगाव येथील किशन विठोबा मोरे हा  पत्नी पंचफुलाबाई व दोन विधवा सुनेसह राहतो.  मात्र काल ता. १९ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान किशन मोरे व पत्नी पंचफुलाबाई यांच्यात  घरगुती कारणावरून भांडणाला सुरुवात झाली. शाब्दिक बाचाबाची नंतर भांडण विकोपाला गेल्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा - नांदेड शहरात मोबाईल चोरटे सक्रिय, कुठे आहे डीबी पथक...?

हातातील काठीने सुनेवरच हल्ला चढवला

सासूला मारहाण होत असलेली पाहवल्या गेली नसल्याने मोठी सुन मिरा माधव मोरे ही भांडण सोडवायला गेली. सासूला  वाचावण्याचा प्रयत्न करत असताना सासऱ्याने हातातील काठीने सुनेवरच हल्ला चढवला. यात ती रक्तबंबाळ होवून गंभीर जखमी झाली तर सासूलाही डोक्याला जखम झाली. त्यामुळे दोघांनाही नांदेड तेथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचार चालू असतांना सुन मिरा माधव मोरे यांचा मृत्यु झाला. 

देगाव येथेच गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले

मयत मिरा मोरे यांच्या प्रेताची उणरीय तपासणी झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात देगाव येथेच गुरुवारी दुपारी  अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनेच्या मृत्यूस कारणीभूत असलेला सासरा किशन मोरे फरार असून कुंटूर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.  मयत मिरा याचा पती माधव मोरे यांनी पाच वर्षापुर्वी गळफास घेवून आत्महत्या केली होती तर  पत्नी मिराचा अशापध्दीने मृत्यू झाल्याने एक मुलगा व एक मुलगी दोन चिमुकल्यांचा मायेचा आधारच हरवला आहे. त्यामुळे देगाव येथे एकिकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर दुसरीकडे नराधम किशन मोरे याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे