माहूरच्या 'मुबारक' ने केले राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व

file photo
file photo

वाई बाजार ( जिल्हा नांदेड ) : आदिवासी दुर्गम डोंगराळ व नक्षल प्रवण क्षेत्र संबोधले जाणारे माहूर तालुक्यातील तरुणांची गुणवैशिष्ट्ये मात्र आता अटकेपार झेंडे रोवत आहेत. सध्या भुवनेश्वर ( ओडिसा ) येथे सुरु असलेल्या ६९ व्या सीनियर राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून माहूर तालुक्यातील छोट्याशा तांदळा या दुर्गम गावातील मुबारक अली हा संघाचा कर्णधार म्हणून नेतृत्व करत आहे.

सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या मुबारक अलीचे वडील सय्यद अली हे मुळात शेतकरी आहेत. दैनंदिन जीवनातील त्यांचा नित्यक्रम नेहमीचाच आहे.मुबारक अलीचे प्राथमिक शिक्षण माहूर तालुक्यातील त्याच्या मूळ गावी तांदळा येथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने माहूरच्या निकट असलेल्या विदर्भातील पुसद येथे प्रवेश केला. शिक्षण पूर्ण करत असताना त्याला आवड असलेल्या व्हॉलीबॉल खेळाचे सराव त्याने सुरु ठेवले त्यानंतर त्याने पुढील शिक्षणासाठी पुणे येथील शिवाजी मराठा कॉलेज निवडले. तेथे क्रीडाशिक्षक देविदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल सुरु झाली.

प्रारंभी मुबारकला कॉलेजमार्फत गुजरात व्हॉलीबॉल अकॅडमीमध्ये पाठविण्यात आले. ही बाब मुबारकसाठी छोटी नव्हतीच त्या ठिकाणी गेल्यानंतर माहूर तालुक्यातील अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून अद्यापपर्यंत गावात एसटी येऊन न शकणाऱ्या तांदळ्याच्या मुबारकने चीज केले. त्याच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर त्याची पहिली नियुक्ती गुजरातच्या संघात झाली. आंतरराष्ट्रीय 'प्रो' व्हॉलीबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरीमुळे मुबारकला नावलौकिक मिळाले आणि तेथून खऱ्या अर्थाने त्याच्या यशस्वी आयुष्याची सुरुवात झाली. खेळाच्या बळावर राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी मिळाली. आणि मग काय दुर्गम भागातील मुबारकने खऱ्या अर्थाने संधीचे सोने करुन फक्त त्याच्या गावालाच नव्हे तर माहूर तालुका व सोबतच नांदेड जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर रुतबा मिळवून दिला. 

व्हॉलीबॉल खेळातील त्याची उत्तम कामगिरीमुळे व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित भुवनेश्वर ( ओडिसा ) येथे (ता. ११) मार्चपासून सुरु झालेल्या ६९ व्या सिनियर नॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारपदाची धुरा मुबारक अलीच्या खांद्यावर टाकण्यात आली. आणि या निमित्ताने तो संघाचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत आहे. महाराष्ट्राचा अंदमान आणि निकोबार संबोधल्या जाणाऱ्या माहूर तालुक्याच्या खाणीत मुबारकसारखे अजून ही अनेक हिरे निपजत असल्याचे अनेक उदाहरण क्रीडा, साहित्य, चित्रकला व संगीत आदी क्षेत्राच्या माध्यमातून देशभरात प्रसिद्धीझोतात पाहायला मिळत आहेत.

मागील अनेक वर्षापासून राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे माहूरचे भुमिपुत्र विजय संतान यांना भारतीय क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या भारतीय शालेय खेळ महासंघाने (एसजीएफआय) या राष्ट्रीय क्रीडा संस्थेवर महासचिव पदी नुकतेच नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या रुपाने मराठवाड्याला हा बहुमान प्रथमच मिळाला आहे. संताननंतर मुबारक अलीने मागास संबोधल्या जाणाऱ्या माहूरने राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com