मुखेड खून प्रकरण : आरोपीला तेलंगणात सिनेस्टाईल अटक, कोठडी

प्रल्हाद कांबळे | Thursday, 13 August 2020

खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अज्ञातस्थळी फेकून देणाऱ्या व फरार झालेल्या आरोपीला मुखेड पोलिसांनी तेलंगणातून पाठलाग करुन अटक केली.

नांदेड : मुखेड येथील बालाजी निवृत्ती गंगावणे (वय ३०) याचा किरकोळ वादातून खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अज्ञातस्थळी फेकून देणाऱ्या व फरार झालेल्या आरोपीला मुखेड पोलिसांनी तेलंगणातून पाठलाग करुन अटक केली. तो घटना घडल्यापासून म्हणजेच पाच आॅगस्टपासून फरार होता. 

मुखेड येथील खून प्रकरणातील दुसऱ्या आरोपीस पोलिसांनी तेलंगणातील महेश्वरम येथे तब्बल दोन किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या. ता. चार ऑगस्ट रोजी खूनाची घटना घडली होती. बालाजी गंगावणे याचा किरकोळ वादातून खून करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांनी खुनाचा तपास आपल्या हाती घेऊन पहिला आरोपी अविनाश रावसाहेब शिंदे रा. होंडाळा, हल्ली मुक्काम गाडगेबाबानगर मुखेड यास ताब्यात घेऊन अटक केली होती. परंतु त्याचा साथीदार झेल्या सर्जा शिंदे रा. खंडाळा (ता. मुखेड) हा पळून जाऊन त्याच्या भावाकडे महेश्‍वरम (जि. हैदराबाद) येथे गेला होता.

हेही वाचा नांदेड : कर्जमाफीचा जिल्ह्यातील एक लाख ४३ हजार शेतकऱ्यांना फायदा

दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी 

याबाबतची गोपनीय माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक गजानन काळे, पोलीस नाईक व्यंकट जाधव यांनी सापळा रचून दुसरा आरोपी झेल्या शिंदे हा राहत असलेल्या ठिकाण गाठले. पोलिस आपल्या मागावर येथे आल्याची चाहूल त्याला लागताच तो पळाला. दीड किलोमीटर पाठलाग करून त्यास सिनेस्टाईल अटक करण्यात पोलिसांना यश आले. ता. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी मुखेड पोलिस ठाण्यात हजर केले. त्यानंतर त्याला अटक करुन बुधवारी (ता. १२) पोलिसांनी झेल्या शिंदे याला मुखेड न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने सरकारी वकिलाचा युक्तीवाद ऐकूण न्यायाधीशांनी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

पुरावा नष्ट करण्यासाठी नदी परिसरात टाकला होता 

ही घटना मुखेड तालुक्यातील जांब बुद्रुक येथील घरगुती कामानिमित्त बालाजी गंगावणे गेला होता. लॉकडाऊनमुळे वाहने नसल्यामुळे ओळखीच्या व्यक्तीसोबत तो चार ऑगस्ट रोजी रात्री निघाले. रात्री सव्वा सात वाजेच्या दरम्यान होंडाळा येथून सांगवी बेनक येथे कच्च्या रस्त्याने जात असताना आरोपी अविनाश शिंदे सोबत त्याचा वाद झाला. त्यावेळी आरोपीने आणि इतर साथीदारांच्या मदतीने गंगावणे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंगावणे यांचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी बाजूलाच असलेल्या नदी परिसरातील गवतात फेकून दिले. ता. पाच ऑगस्ट रोजी एका गुराख्याने ही माहिती गावातील नागरिकांना कळविल्यानंतर घटनेचा शोध लागला.देगलुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे, पोलीस निरीक्षक नरसिंग अकुशकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे, फौजदार गजानन काळे आदीनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता.