महापालिकेचे वरातीमागुन घोडे, आता अॅन्टीजेन टेस्टची पावती देणार- आयुक्त डाॅ. सुनिल लहाने

प्रल्हाद कांबळे
Saturday, 15 August 2020

जिल्हा प्रशासनाच्या दररोजच्या प्रेसनोटमध्ये अॅन्टीजेन टेस्टची आकडेवारी येत नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे. हा गोंधळ कमी करण्यासाठी आता महापालिकेच्या वतीने तपासणी केलेल्या नागरिकांच्या हातावर पाॅझिटिव्ह हो या निगेटिव्ह अहवालाची तपासणी पावती देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डाॅ. सुनिल लहाने यांनी सांगितले. 

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखुन त्यावर प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात सहा फिरत्या वाहनाद्वारे नागरिकांची सामुहीक अॅन्टीजेन रॅपीड टेस्ट करण्यात येत आहे. मात्र तपासणी केलेल्या संशयीतांना कुठलीच पावती देण्यात येत नसल्याने तपासणी नेमकी कोणाची झाली याचा ताळमेळ बसत नाही. तसेच जिल्हा प्रशासनाच्या दररोजच्या प्रेसनोटमध्ये अॅन्टीजेन टेस्टची आकडेवारी येत नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे. हा गोंधळ कमी करण्यासाठी आता महापालिकेच्या वतीने तपासणी केलेल्या नागरिकांच्या हातावर पाॅझिटिव्ह हो या निगेटिव्ह अहवालाची तपासणी पावती देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डाॅ. सुनिल लहाने यांनी सांगितले. 

महापालिकेच्या वतीने गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या रॅपिड तपासणी मोहिमेत ज्यांनी चाचण्या केल्या त्यांना अहवालाची पावती देण्याचा विचार सुरु असून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या माहितीत महानगरपालिकेच्या मोहीमेतील आकड्यांचा समावेश का होत नाही याचा शोध घेण्यातयेत आहे. यापुढे ती गैरसोय दूर करण्यात येईल असे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या क्षेत्रात सहा फिरत्या वाहनांद्वारे विविध ठिकाणी दररोज तपासणी मोहीम सुरु आहे. गर्दीच्या ठिकाणी तसेच रुग्णालय, कंटेनमेंट झोन घेऊन या सारख्या पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याच्या संशयीत जागेच्या परिसरात जाऊन व्यापारी, कामगार, भाजीविक्रेते त्यांच्या संपर्कातील व अन्य नागरीक यांच्या मोफत चाचण्या केल्या जात आहेत.

हेही वाचा -  नांदेड : अर्धापूर येथील नगरपंचायतमधील दोघेजण लाचेच्या जाळ्यात

नगरसेवक व इतर व्यक्ती स्वार्थासाठी पुढे येतात मात्र आता कुठे गेले 

या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला असला तरी चाचणी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे विलगीकरण वेळेवर केले जात नसल्याने मोहिमेदरम्यान गोंधळ उडत आहे. मनपाच्या वाहनातील टेक्निशियन चाचणी करून पॉझिटिव्ह असल्याचे सांगतात परंतु निगेटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णाच्या हाती कुठलेच प्रमाणपत्र दिल्या जात नाही. ही मोहीम राबवण्यासाठी काही नगरसेवक व इतर व्यक्ती स्वार्थासाठी पुढे येतात त्याप्रमाणे पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांबद्दल मात्र गांभीर्याने पाहिल्या जात नाही.

तपासणी मोहिमेत साडेतीनशेहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

मागील पाच दिवसात फिरत्या वाहनांद्वारे शहरात सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत साडेतीनशेहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. परत जिल्हा प्रशासनाकडून दररोज प्रसिद्ध होणारे प्रेसनोटमध्ये आकडे दुसऱ्या- तिसऱ्या त्यानंतरही दिल्या जात नाहीत. त्यांचे संकलन करून संकेतस्थळावर अपलोड करणारा एक डॉक्टर मागील आठवड्यात पाॅझिटिव्ह आल्याने आकडे नोंदविण्याची प्रक्रिया ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे. शासन स्तरावर देखील मागील पाच दिवसांपासून ही माहिती नोंदवली गेली नसल्याचे दिसून येते. औरंगाबाद, लातूर यासह अन्य जिल्ह्यात अॅन्टीजेन टेस्टची पावती पॉझिटिव्ह, निगेटिव्ह लगेच संबंधित संशयित रुग्णांच्या हातात ठेवले जाते. परंतु नांदेडात ही परिस्थिती पहावयास मिळत नाही. शहरातील विविध भागात नागरिकांच्या चाचण्या होत असताना त्यांनी चाचण्या केल्या आहेत किंवा नाहीत त्यांची ओळख पटविण्यासाठी महापालिकेला आपले रेकॉर्ड शोधण्याची वेळ आली आहे. त्याऐवजी नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना त्याच्या तपासणी पावत्या दिल्या तर शोध मोहिचे काम हाती घेण्याची वेळ येणार नसल्याचे बोलल्या जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation's show, will now give receipt of antigen test- Commissioner Dr. Sunil Lahane nanded news