जिल्ह्यात खुनाची मालिका सुरुच : नांदेडात खंजरने भोसकुन एकाचा खून

प्रल्हाद कांबळे
Monday, 24 August 2020

मागील आटवड्यात झालेल्या गुन्ह्यांचा तपास लागला नसतानाच पुन्हा शहराच्या नुरी चौक भागात जुन्या वादातून एका युवकाचा खंजरने भोसकुन खून करण्यात आला. ही घटना रविवारी (ता. २३) रात्री साडेआठच्या सुमारास महेबूबनगर येथे घडली.

नांदेड : शहरात मागील काही दिवसापासून खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बॅग लिफ्टींग आदी गंभीर घटनांत कमालीची वाढ होत आहे. मागील आटवड्यात झालेल्या गुन्ह्यांचा तपास लागला नसतानाच पुन्हा शहराच्या नुरी चौक भागात जुन्या वादातून एका युवकाचा खंजरने भोसकुन खून करण्यात आला. ही घटना रविवारी (ता. २३) रात्री साडेआठच्या सुमारास महेबूबनगर येथे घडली.

शहराच्या फारुखनगर भागात राहणारा शेख मोसीन उर्फ मडगाड शेख युसूफ (वय २०) याचे आणि शाहरुखान अनवरखान याचा जुना वाद होता. या वादातून शेख मोसीन याला नुरी चौक. महेबुबनगर येथे शाहरुखखान याने रस्त्यात अडवून वाद घातला. वाद विकोपाला जात शाहरुखखान (वय २१) याने सोहेल खान अनवरखान (वय २०), अमिरखान अनवरखान  (वय २२) आणि सलमानखान अन्वरखान (वय १८) यांना बोलावून घेतले. या चार जणांनी मिळून शेख मोसीन याला जबर मारहाण केली. 

हेही वाचानांदेड जिल्हा गुन्हेगारीमुक्त करणार, प्लॅन तयार- एसपी विजयकुमार मगर

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट

एवढेच नाही तर शाहरुखान अनवरखान याने शेख मोसीन याच्या डोक्यात, कमरेजवळ, पाठीवर खंजरने भोसकले. यात शेख मोसीन हा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. तरीही बाकीच्या तीन जणांनी त्याला लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. जखमी शेख मोसीन याला विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारानंतर शेख मोसीन याचा सोमवारी (ता. २४) पहाटे मृत्यू झाला. या घटनेनंतर महेबुबनगर परिसरात भितीचे वातावरण परसले आहे. घटनास्थळाला पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के आणि विमानतळचे पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांनी भेट दिली. त्यानंतर तेथील प्रकरण निवळले. 

विमानतळ पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल 

मयताचा भाऊ शेख वसीम शेख युसुफ (वय २८) याच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात शाहरुखखान, सोहेलखान, अमिरखान आणि सलमानखान या चार जणांवर खून,भारतीय हत्यार कायदा यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक संजय ननवरे करत आहेत. याच प्रकरणात शाहरुखखान अन्वरखान याच्या फिर्यादीवरुन शेख मोसीन उर्फ मडगड (उपचारानंतर मृत्यू), शेख सोहेल रा. नई आबादी आणि शेख अमेर शेख अमजद रा. महेबुबनगर यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder series continues: Murder of a man stabbed in Nanded