Nanded : लोह्यात ७५ कोटीची पाणीपुरवठा योजना होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded

Nanded : लोह्यात ७५ कोटीची पाणीपुरवठा योजना होणार

लोहा : लोहा नगरपालिकेच्या सभागृहात शुक्रवारी नगरपालिकेचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहराची तहान भागविण्यासाठी ७५ कोटीची पाणी पुरवठा योजना शासनस्तरावर असल्याची माहिती नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी दिली.

यावेळी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज मुर्तीस व लोहा नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष (कै.) माणिकराव पाटील पवार यांच्या प्रतिमेस लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष दत्ता वाले, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, ज्येष्ठ नगरसेवक बबन निर्मले, गटनेते करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, नगरसेवक संदीप दमकोंडवार, केतन खिल्लारे, नबीसाब शेख, नगरसेवक अमोल व्यवहारे, संभाजी पाटील चव्हाण, जीवन चव्हाण, भास्कर पवार आदी उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्ष सुर्यवंशी म्हणाले की, राज्य शासनाने एक परिपत्रक काढून नगरपालिकेने वर्धापन दिन साजरा करण्याचे आदेश पारित केलेत. लोहा व विठ्ठलवाडी.

हे दोन्ही गावे एक होऊन येथे नगरपालिका झाली पाहिजे. विकास झाला पाहिजे म्हणून तात्कालीन आमदार भाई केशवराव धोंडगे, प्रथम नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार, माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले व राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) शंकरराव चव्हाण यांनी लोहा नगरपालिकेला मंजूरी दिली. कै. माणिकराव पाटील पवार व कल्याण सावकार सुर्यवंशी एकदिलाने राहत होते ते एका कुटुंबातील असल्यासारखे होते.

लोहा शहराच्या विकासासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून निधी आला. अनेक विकासकामे केली. लोहा शहरातील नागरिकांना कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी खासदार चिखलीकर यांच्या माध्यमातून शासन स्तरावर लिंबोटी धरणातून पाणी आणण्यासाठी ७५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन स्तरावर असून तो लवकरच मंजूर होईल.

लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा लवकरच बसविण्यात येईल. लोहा नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या खरेदीसाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच मुस्लिम शादीखाना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ही स्मारक करण्यात येईल तसेच वार्डातील विकासकामे करण्यात येतील आणि वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सुर्यवंशी यांनी सांगितले. सभागृहाला प्रथम नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार यांचे नाव दिल्याबद्दल नगराध्यक्ष सुर्यवंशी व सभागृहाचे आभार मानले.

टॅग्स :Nandedwaterschemes