नांदेड : कोरोनाच्या संघर्षाची वर्षपूर्ती; कटू आठवण घेऊन कोरोनाची लढाई सुरुच

file photo
file photo

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : कोरोनाच्या महामारीने लोकल ते ग्लोबल असा सर्वव्यापी परिणाम झाला. या काळात सर्व क्षेत्रातील उणिवा प्रगट झाल्या त्याचसोबत जाणिवादेखील निर्माण झाल्या आहेत. या काळात अस कुठलंच क्षेत्र राहील नाही की, त्यावर कोरोनाचा परिणाम झाला नाही. यात आरोग्य, आर्थिक, शिक्षण, शेती, उद्योग, व्यापार, बेरोजगारी, हिंसाचार यावर झाला. आज जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण सापडून वर्ष उलटले असले तरी आटोक्यात आला नाही. त्याकाळातील कटू आठवणी सोबत घेऊन जीवन जगण्याची ही लढाई सुरुच आहे.  

शत्रू जेंव्हा उघड असतो त्याच्याशी लढणे सोपे असते. पण जेंव्हा तो अदृश्य असतो त्याच्याशी लढणे अतिशय कठीण असते. या अदृश्य विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी गेल्या वर्षभरापासून आरोग्य यंत्रणा जिकिरीचे काम करत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात 200 खाटांचे रुग्णालय सुरू झाले. इतर काही थोड्या प्रमाणात सुविधा सोडल्यातर अजूनही आरोग्याच्या बाबतीतील भौतिक सुविधा व उपाययोजनेला गती नाही. अजूनही डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अजूनही प्रचंड अपुरा कर्मचारी वर्ग आहे. व्हेंटिलेटरची वानवा आहे. गेल्या वर्षभरात डॉक्टर, आरोग्य सेवक, परिचारिका यांनी मात्र जीवावर उदार होऊन आपले काम बजावले. आणि आजही त्याच तत्परतेने काम सुरु आहे. त्यातच वाढता कोरोनाचा गैरफायदा घेऊन खासगी दुकानदारीही पाहायला मिळाली. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची उपचाराचे शुल्क पाच लाख रुपयांपर्यंत पाहायला मिळाले.

कोरोना महामारीमुळे तब्बल तीन महिने लॉकडाऊनमुळे उद्योग व्यापाराचे अर्थचक्र थांबले. निर्मिती आणि विक्री हे दोन्ही चाक थांबल्यामुळे अनेक उद्योग व व्यापार बंद पडले. त्यातच बारा बलुतेदार म्हणून काम करणारे उद्योगही बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती. अजून किरकोळ व्यापारी व विक्रेते या धक्क्यातून सावरले नाहीत. त्यातच पून्हा वाढत्या कोरोनामुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. 

सर्वात जास्त फटका हातावर पोट असणाऱ्या मजूरांना बसला. अनेक उद्योग व कारखानदारी बंद पडल्यामुळे हातचा रोजगार गेला. अनेकांना गावचा रस्ता पकडावा लागला. जिल्ह्यात हा आकडा अनेक लाखाच्या घरात आहे. अनेकांना तर हजारो किलोमीटर पायीच प्रवास करुन आणि आपले घर गाठावे लागले.

जगात कुठलेही संकट आले तरी त्याचा पहिला मार हा शेतकऱ्यांवरच असतो. शेतीला मोठा फटका बसलेला आहे. बाजारपेठ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला मागणी नव्हती. शेतातील फळे, भाजीपाला, फुले यांची नासाडी झाली. शेतातील माल बाहेर फेकावा लागला. पण याच शेतीने अनेकांच्या हाताला रोजगारही दिला. सगळीकडे कामे बंद असताना मात्र शेतीतील कामे सुरूच आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाची विस्कटलेली घडी अजूनही सुरुच आहे. अख्ख वर्षभर विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. नेमकीच शाळा सुरु होण्याची परिस्थिती असताना पून्हा शाळा आणि खासगी क्लासेस बंद पडले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत मात्र एक बदल आवर्जून पाहायला मिळाला. तो म्हणजे शिक्षणाच्या पद्धतीत बदल पाहायला मिळाला. तो शाळेशिवाय ऑनलाइन शिक्षण हा आमूलाग्र बदल पाहायला मिळाला. तसेच कार्यालयात न जाता ऑनलाईन ड्युटी ही संकल्पना समोर आली आहे.

एका छोट्याश्या विषाणूने अनेक नात्यांमध्ये दुरावा आणला. कोरोना झाल्यानंतर तो व्यक्ती कितीही जवळचा असला तरीही  त्या व्यक्तीबाबत दुरावा निर्माण झाला होता. एकमेकांच्या सामाजिक अंतरासह मनातील अंतरही वाढले होते. कुणी- कुणाला मदत करायला पुढे येत नव्हते. या सामाजिक उणिवा पाहायला मिळाल्या. त्यातच कठीण काळातही अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे आले. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणारे फिरस्ती, मजूर, पाल टाकून बसलेले भटके यांना मदत करुन यांच्यासह अनेकांना मदत करुन सामाजीकतेची जाणीवही करुन दिली. कोरोनाची लस देणे सुरु झाले असले तरी काळजी घेणे आवश्यकच आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्ष्यात घेता. सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर यावर त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com