
नांदेड - महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या आणि महत्त्वकांक्षी ठरणाऱ्या नांदेड - बिदर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून पिंक बुकमध्ये नोंदही करण्यात आली आहे. परंतु एक वर्ष उलटून गेले तरी अद्यापही या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागाला विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या नांदेड - बिदर या रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. त्या अनुषंगाने दोन्ही राज्यांना कालमर्यादा द्यावी, अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोकसभेत केली.
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच खासदार चिखलीकर यांनी लोकसभेत महत्त्वाचा असलेल्या नांदेड बिदर रेल्वेचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालून नांदेड - बिदर हा रेल्वे मार्ग मंजूर केला होता. त्यासाठी पिंक बुकमध्ये तरतूदही करण्यात आली.
परंतु त्यानंतर या कामाच्या प्रगतीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क केला असता रेल्वे मंत्रालयाने जे पत्रव्यवहार केला आहे, त्यानुसार महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्याच्या सहमतीसाठी हा प्रस्ताव प्रलंबित आहे. दोन्ही राज्याकडून सहमती मिळाली नसल्याने या कामाला सुरुवात करण्यात आली नाही.
परिणामी नांदेड - बिदर मार्गावरील ग्रामीण भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विलंब होतो आहे ही बाब गंभीर असल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही सरकारला आपली सहमती देण्यासाठी आणि राज्यांचा आर्थिक वाटा उचलण्यासाठी कालमर्यादा निश्चित करून द्यावी आणि तातडीने या मार्गाच्या कामाला सुरुवात करावी. जमीन अधिग्रहणाचे प्रश्न दोन्ही राज्याने आपापल्या कार्यक्षेत्रातील तातडीने सोडवावेत यासाठीही केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही खासदार चिखलीकर यांनी केली आहे.