Nanded : दिवाळी खरेदीत केरसुणीला मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded broom kersuni zadu Demand

Nanded : दिवाळी खरेदीत केरसुणीला मागणी

नांदेड : तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरीही परंपरा, संस्कृती आणि काही गोष्टींचे धार्मिक महत्त्व कमी होत नसल्याचे दिवाळी सारख्या सण उत्सवात दिसून येते. लक्ष्मी पूजनात आवर्जून स्थान असणाऱ्या केरसुणीमुळे (झाडू) ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. दिवाळी खरेदीत आकाशकंदील, पणत्या, फटाके आणि कपड्यांसोबत केरसुणीचाही समावेश असतोच. धनत्रयोदशीला खरेदी करून लक्ष्मी पूजनाला तिची पूजा करण्याची परंपरा असल्याने आजही केरसुणी बाजारात आपले अस्तित्व टिकवून आहे.

दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा करण्याची प्रथा आहे. ग्रामीण भागात आजही ही प्रथा पाळली जाते. कोरोना संसर्गात लाॅकडाउनच्या काळात या केरसुणी तयार करून विकणाऱ्यांना मोठा फटका बसला होता.

निर्बंधांमुळे या लोकांना गावोगावी फिरून व्यवसाय करता आला नाही. यंदा दिवाळीमध्ये निर्बंध शिथिल झाल्याने सर्वत्र खरेदीसाठी गर्दी आहे. पूजनासाठी केरसुणीला देखील मागणी आहे. केरसुणीला लक्ष्मी माणून पूजा करण्याची प्रथा आहे. ही लक्ष्मी अर्थात केरसुणीचे दर यंदा १५ ते २० टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेते सांगतात.

दिवाळी सण उद्यापासून शुक्रवारी (ता.२१) वसुबारसने सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारबेठेत सर्वत्र खरेदीची लगबग दिसून येत आहे. अशाच लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असलेली केरसुणी बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. आधुनिक काळातही नागरिक केरसुणी खरेदीसाठी विशेष पसंती दाखवत आहेत. शिंदीच्या झाडापासून तयार केलेल्या केरसुणी दिवाळी पूजनासाठी महत्त्वाचे स्थान असते.

परराज्यातून मालाची आयात

मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडांच्या पानापासून केरसुणी तयार केली जाते. राज्यात ही झाडे नष्ट झाली असून, शिंदीचे पान मध्य प्रदेशातील इंदूर, फतीयाबाद, चौरण येथून आयात केले जाते. केरसुणी १०० ते १२० रुपयाला जोडी विकली जाते. आधुनिक झाडूची किंमती १५० ते २०० रुपये इतकी आहे.

राखते घराला

माय केरसुणी

सावरते सारं

केर शेण पाणी...

गेला काळ बाई

वाकून झोकून

पैका झाला मोठा

जगण्याहून...

- व्यंकटेश चौधरी, गट शिक्षणाधिकारी.

केरसुणी तयार करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मोठी केरसुणी ६० रुपये तर छोटी केरसुणी ५० रुपये दराने विक्री होत आहे. देवघरासाठीची केरसुणी २० रुपयेप्रमाणे विक्री केली जात आहे. पन्हळी झडकून, चिरून, नार काढून मुट धरणे अशा प्रकारे केरसुणी तयार केली जाते.

- किरण पारधे, केरसुणी विक्रेता, चौफाळा, नांदेड.