नांदेड बसस्थानक, आगारात कामांना वेग

प्रल्हाद कांबळे
Saturday, 26 December 2020

त्यानंतर या समितीने एसटी मध्यवर्ती बसस्थानक व आगारात फेरफटका मारुन अस्वच्छता,सोयीसुविधांचा अभाव जाणून घेतला आणि शहरातील काही दानशुरांच्या मदतीने विविध सोयी सुविधा पुरविण्याच्या कामाला वेग दिला आहे.

नांदेड- राज्य परिवहन मार्ग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या संकल्पेतून नांदेड एसटी आगारात विश्वासू प्रवासी संघटनेची स्थापना १ डिसेंबर रोजी करण्यात आली. त्यानंतर या समितीने एसटी मध्यवर्ती बसस्थानक व आगारात फेरफटका मारुन अस्वच्छता,सोयीसुविधांचा अभाव जाणून घेतला आणि शहरातील काही दानशुरांच्या मदतीने विविध सोयी सुविधा पुरविण्याच्या कामाला वेग दिला आहे.

आगार प्रमुख पुरुषोत्तम व्यवहारे, बसस्थानकप्रमुख वर्षा येरेकर यांच्या उपस्थितीत विश्वासू प्रवासी संघटना स्थापन झाली. या संघटनेचे अध्यक्ष शंकर नांदेडकर, उपाध्यक्ष कृष्णा उमरीकर, सचिव ललिता कुंभार, सदस्य बालाजी पवार, रमाकांत घोणसीकर, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, बालाजी पाशावार, बालाजी ढगे, हरजिंदरसिंघ संधू यांनी आपापल्या वेळेनुसार एसटी मध्यवर्ती बसस्थानक, आगाराची पाहणी करुन सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, स्वच्छता राखणे, बसस्थानकातील फलाटावर गावांच्या नव्या पाटा तयार करणे, अंधाराचे साम्राज्य दूर करण्यासाठी लंगर साहिब गुरुद्वाराकडून दोन मोठे फोकस बसवून घेणे, बसस्थानक व आगार परिसरात जेसीबी मशीनने सपाटीकरण, सरळीकरण, पुरेपूर प्रकाशासाठी दिवे बसवणे,रोजच्या रोज परिसर स्वच्छता राखणे आदी कामांना गती दिली आहे. या कामी लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा बलविंदरसिंघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे सहकार्य दिले आहे.

नियुक्ती पत्रे वितरित

दरम्यान, विश्वासू प्रवासी संघटना नांदेडच्या पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्रही एसटी महामंडळातर्फे देण्यात आले आहे. हे पत्र २१ डिसेंबर रोजी जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या लेबर कॉलनीतील कार्यालयात झालेल्या बैठकीत वितरित करण्यात आले.अध्यक्षस्थानी शंकर नांदेडकर होते. यावेळी एसटी बसस्थानक व आगारातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला. नंतर नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. शंकर नांदेडकर, ललिता कुंभार, कृष्णा उमरीकर, बालाजी पवार, बालाजी ढगे, रमाकांत घोणसीकर,नवनियुक्त सदस्य हरजिंदरसिंघ संधू आदी उपस्थित होते. आगार प्रमुख पुरुषोत्तम व्यवहारे, बसस्थानकप्रमुख वर्षा येरेकर यांच्याशी चर्चा करुन मंजूर केलेली कामे प्रगतीपथावर असल्याचे नांदेडकर यांनी सांगितल. तसेच बसस्थानक व आगारात डांबरीकरण व मजबुतीकरण कामासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना लवकरच भेटण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded bus stand, speed up work in the depot nanded news