नांदेड : मागील आठवडाभरापासून हवामानात बदल जाणवत होता. कधी सोसाट्याचा वारा, ढगाळ वातावरण तर कधी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी असा वेगळा अनुभव आला होता. दरम्यान, मराठवाड्यातील काही भागात पाच दिवसात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवल होता. गुरूवारी सकाळी शहरासह जिल्ह्यात काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने हवामान विभागाचा अंदाज अंदाज खरा ठरला आहे.
गुरूवारी पाऊस पडल्यानंतर दुपारनंतर वातावरणात उष्णता वाढून नागरिक घामाघूम झाल्याचे पहावयास मिळाले. गुरुवारी सकाळी शहरासह तरोडा, वाडी, विष्णुपुरी, सिडको, हडकोसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. किनवट तालुक्यात मांडवी आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अचानक ढग दाटून आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. शहरातील अनेक नाल्यांचा कचरा साफ केला नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरुन वाहत होते.
ग्रामीण भागात सध्या शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून, शेतकरी सकाळपासूनच शेतात कामासाठी जात आहेत. मात्र, गुरूवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यासह कामासाठी वाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी झालेल्या पावसामुळे दिवसभर उष्ण आणि दमट वातावरण निर्माण होवून नागरिक घामाघूम झाले. आधीच नांदेडचा पारा ४२ अंशावर जाऊन पोहचला असून, त्यात भर पावसाची पडली. त्यातच अधूनमधून वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे चांगलेच हाल झाले.
निवघा, तळणी परिसरात पाऊस
निवघबाजार हदगाव तालुक्यातील निवघा, तळणी सह परिसरात गुरूवारी सकाळी आठ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. बऱ्याच दिवसाच्या उकाड्यापासून थोड्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. मान्सूनपूर्व पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. तर या पावसाने शेतातील कामांना वेग येणार आहे. एक तास पडलेल्या सुसाट वाऱ्यासह पावसाने अनेकांचे घरावरील पत्रे उडाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले. तर वीज पुरवठा खंडीत झाला होता. बोरगांव शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील उन्हाळी ज्वारी भुईसपाट झाली, अनेक शेतकऱ्यांचे भुईमुग, तिळ, ज्वारी काढणीस आलेली असताना पावसाने नुकसान झाले आहे. परिसरातील शिरड, मनुला, पेवा, माटाळा, निवघा, हस्तरा, बोरगांव, तळणी, शिऊर, चक्री, महाताळा, आमगव्हाण इत्यादी गावात पाऊस झाला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.