नांदेड : ‘नवतपा’ सोबतच वादळी पावसाचे सावट

सतर्क राहण्याचे आवाहन; उत्तरार्धात बसणार उन्हाचे तीव्र चटके
Nanded climate change Heavy rains along with temperature
Nanded climate change Heavy rains along with temperaturesakal

नांदेड : विक्रमी ऊन व सर्वाधिक चटके देणारा नवतपा बुधवारपासून सुरु झाला आहे. यंदाच्या नवतपावर सुरवातीला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचे सावट राहणार आहे. त्यानंतर तीव्र लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षी प्रमाणेच यावेळी देखील नांदेडकरांना चटक्यांपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ता. २५ मे ते ता. दोन जून हा नऊ दिवसांचा काळ नवतपा म्हणून ओळखला जातो. नवतपामध्ये दिवस मोठा १३ तासांचा असतो. सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ व सूर्यकिरणे सरळ पृथ्वीवर पडत असल्याने उन्हाचे चटके अधिक प्रखरतेने जाणवतात. त्यामुळे कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत जाते. तसेच सूर्यापासून येणारी ऊर्जा अधिक पृथ्वीवर राहते. या गुण वैशिष्ट्यांमुळे नवतपामध्ये पाऱ्याने अनेकवेळा विक्रमी उसळी घेतल्याचे नांदेडकरांनी यापूर्वी अनुभवले आहे.

या वेळचे चित्र थोडे वेगळे राहणार आहे. कारण नांदेडसह मराठवाडा, विदर्भात तीन-चार दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे नवतपाच्या पूर्वार्धात काही दिवस नागरिकांना उन्हापासून थोडाफार दिलासा मिळू शकतो. मात्र, त्यानंतर कडक उन्हाळा तापण्याची दाट शक्यता आहे. या काळात नांदेडचा पारा ४३ अंशांपार जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अवकाळीमुळे माॅन्सूनवर विपरित परीणाम

नवतपामध्ये अवकाळी पडणे माॅन्सूनसाठी चांगली गोष्ट नसते. कारण या काळात प्रचंड गरमी व सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडल्यास समुद्रातील पाण्याचे वेगाने बाष्पीकरण होऊन ढग निर्माण होतात. त्यामुळे दमदार माॅन्सून बरसण्याची शक्यता असते. या उलट नवतपा दरम्यान समुद्री भागात पाऊस पडत राहिल्यास बाष्पीकरणाची प्रक्रिया थांबून ढग कमी बनते. त्यामुळेच नवतपाच्या काळात प्रखर ऊन तापणे खूप आवश्यक असते. असे असले तरी, भारतीय हवामान विभागाने यंदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा यावेळी माॅन्सूनवर फारसा परिणाम होईल, अशी शक्यता कमीच आहे.

‘नवतपा’मध्ये अशी घ्या काळजी

नवतपामध्ये तब्येतीवर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याने काळजी घेण्याची गरज असते. त्यामुळे या दिवसामध्ये सहसा हलका नाष्टा करूनच घराबाहेर पडायला पाहिजे. शिवाय दिवसभर अधूनमधून भरपूर पाणी आणि फळांचा रस, दही, मठ्ठा, जलजिरा, लस्सी व कैरीचे पन्हे आदींचे सेवन करणे आवश्यक आहे. तसेच बाहेर फिरताना नेहमी दुपट्टा, टॉवेल, टोपी व गॉगलचा वापर आणि घाम सोसून घेणाऱ्या पांढऱ्या, नरम व सैल कपड्यांचा वापर करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com