
Nanded Crime: १५ लाख ३१ हजारांचा ७१ किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही; तीन आरोपींना अटक
नांदेड - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. सहा) मोठी कार्यवाही केली. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कामठा खुर्द ते माळटेकडी गुरूद्वारामार्गे नमस्कार चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर १५ लाख ३१ हजार रुपये किंमतीचा ७१ किलो ५५० ग्राम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे. काही जण अंमली पदार्थ गांजाची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने गांजा घेऊन जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांना मिळाली.
त्यांनी वरिष्ठांना माहिती देऊन पोलीसांसह महसुलचे अधिकारी यांना सोबत घेऊन बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास माळटेकडी गुरुद्वारा जवळील ओव्हर ब्रीजचे खाली सापळा रचला. बाराच्या सुमारास एक ॲटोरिक्षा (क्रमांक एम एच २६ बी डी ४५०९) आल्यानंतर तपासणी केली असता त्यात गांजाचे प्लॅस्टीकमध्ये छोटे व मोठे पाकीट असा १५ लाख ३१ हजाराचा ७१ किलो ५५० ग्राम ओलसर गांजा मिळुन आला.
ऑटोमध्ये अॅटोचालक मिर्झा मोसीन नजीर वेग (वय २२, रा. मुजामपेठ, धनेगाव), सयद मुक्तार महमद सलीम (वय ३५, रा. हिंगोली नाका), परविन सय्यद मुक्तार (वय ३०, रा. हिंगोली नाका) हे आढळून आले.
या तिघांनी हा गांजा जोहराबी ऊर्फ वव्या खाता अन्वर खान पठाण (रा. टायरबोर्ड) हिने विक्री करण्यासाठी दिला असल्याचे सांगितले आहे. सदरील गांजा जप्त करण्यात आला असून फौजदार काळे यांनी दिलेल्या फिर्यादवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कामगिरी पोलिस अधीक्षक श्री कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. चिखलीकर यांच्यासह पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने, नायब तहसीलदार के. बी. डांगे, फौजदार काळे,
सहायक फौजदार माधव केंद्रे, पोलिस जमादार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, रणधीर राजबन्सी, महेश बडगु, गजानन बयनवाड, महिला पोलिस जमादार पंचफुला फुलारी, महेजबीन शेख, चालक अर्जुन शिंदे, कलीम शेख यांनी पार पाडली.