नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे एका तरुण शेतकऱ्याने आपल्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ता. २२ नोव्हेंबरच्या सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या प्रकरणाची सोनखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोहा तालुक्यातील दगडगाव येथील शेतकरी ज्ञानोबा शुभानजी ढवळे (वय ४२) यांच्या शेतात मागल काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले. यावर्षीही हंगाम हातचा गेल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. आता घरगाडा कसा चालवायचा व कर्जाची परतफेड कशी करायाची या विवंचनेत असलेल्या ज्ञानोबा ढवळे यांनी ता. २२ नोव्हेंबर रोजी शेताचा रस्ता धरला. शेतावर जाऊन उघड्या डोळ्याने विरान झालेला शिवार पाहिला आणि आपल्याच शेतातील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती नातेवाईक पंडीत माणिका ढवळे यांनी सोनखेड पोलिसांना दिली. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. परिहार करत आहेत.
शहर वाहतुक पोलिसाला चाकुचा धाक, वाकीटाकी चोरण्याचा प्रयत्न
नांदेड : शहरातील विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या वाहतुक शाखेच्या पोलिसांवर अनेकवेळा हल्ले झाल्याच्या घटना घडल्या. पोलिसांच्या अंगावर कधी अॅटो, तर कधी दुचाकी घालून जखमी करण्याचा प्रयत्न झआलेला आहे. अनेकवेळा किरकोळ वादाच्या घटना घडत असतात. आता तर चक्क पोलिसालाच चाकुचा धाक दाखवून त्याच्याकडील वाकीटाकी पळविण्याचा प्रयत्न मंगळवारी (ता. २४) सकाळी ११ च्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक उड्डाण पुलावर घडला.
शहर वाहतुक शाखेचे पोलिस तुकाराम तुरटवार हे मध्यवर्ती बसस्थानक उड्डाणपुलावर कर्तव्यावर होते. मंगळवारी (ता. २४) सकाळी ११ वाजता त्यांच्याजवळ माधव किशन सोळंके (वय ३८) रा. शेवडी (ता. लोहा) आणि देविदास पिराजी म्हाटे ( २१) रा. वसमत (जिल्हा हिंगोली) हे दुचाकीवरुन आले. यावेळी परवानासाठी यांची दुचाकी श्री. तुरटवार यांनी थांबविली. आमची दुचाकी का थांबविली म्हणून या दोघांनी त्यांच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर चाकुचा धआक दाखवून त्यांच्याजवळची वाकीटाकी जबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच शासकिय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी तुकाराम तुरटवार यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. आगलावे करत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.