नांदेड : दीपोत्सव आणि निरव शांततेचा अवाढव्य काळ- पी. विठ्ठल

file photo
file photo

नांदेड - गेल्या आठ दहा महिन्यांपासून जी एक अनिश्चितता अवघ्या विश्वाला व्यापून होती ही अनिश्चितता काही अंशी संपुष्टात येत असल्याचे एक आश्वासक चित्र निर्माण होत आहे. भीती आणि जगण्याविषयीच्या संभ्रमाने आपण सारेच अस्वस्थ झालो होतो. कोरोनाने मानवी अस्तित्वालाच मुळापासून हादरून टाकले होते. या अनपेक्षित महामारीच्या लाटेत जगभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. भारतातही हजारोंचा बळी गेला. मानवी इतिहासातील ही अभूतपूर्व घटना ठरली. अर्थात या भयकारी घटनेच्या सावटाखालून आपण पूर्णपणे मुक्त झालो आहोत असं अजून तरी म्हणता येत नाही. पण पुन्हा नव्या हिंमतीने आणि आत्मविश्वासाने माणसाने  जीवनरहाटिच्या दैनंदिनीत स्वतःला गुंतवून घेतले आहे. त्याशिवाय पर्यायही नाही.

गेली अनेक महिने प्रचंड व्यस्त असणारे कोविड सेंटर आणि तिथे कार्यरत असलेल्या डॉक्टर्स, पोलीस आणि इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांना उसंत मिळाली आहे. क्वारंटाइन, आयसोलेशन, अनलॉक, पीपीई किट किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्हचा त्रस्त करणारा मानसिक गोंधळ एकदाचा संपुष्टात येत आहे ही सुखावणारी बाब म्हणायला हवी.

संकट सोबत असले तरी आयुष्याची पुनर्बांधणी करून या सगळ्या संकटाला धैर्याने सामोरे जायलाच हवे. या काळात अनेकांच्या आयुष्याची घडी विस्कटली. विस्थापनाचं मोठं दु:ख  वाट्याला आलं. गुंतागुंतीच्या  अनेक मानसिक, भावनिक पेचांनी मोठा विळखा घातला होता. लॉकडाऊन हा वरकरणी निरव शांततेचा अवाढव्य काळ वाटत असला तरी या काळाच्या अंत:स्तरातून खूप काही वाहून गेलं आहे.  अस्वस्थतेचा, अगतिकतेचा, हतबलतेचा खिन्न अनुभव आपल्यापैकी खूप जणांच्या वाट्याला आला. या काळाणं जगण्याचं एक नवं व्याकरण जन्माला घातलं. या व्याकरणाची भाषा, तत्त्वज्ञान  आणि नोंदींचे असंख्य तपशील येत्या काळात वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर येतीलच. कारण माणसाच्या नेणीवेत या काळाच्या असंख्य स्मृती एकवटल्या आहेत. या स्मृतींची छाननी तात्काळ करता येणार नाही. सगळ्या उर्जा स्रोतांची, मूल्यव्यवस्थेची मोठी हानी झाली आहे. समकालीन नैतिक प्रश्नांच्या संकल्पना बदलल्या आहेत.

पण तरीही या सगळ्या कटू आठवणींना मागे ठेऊन देशभरात दिवाळीच्या आशादायी पणत्या पेटल्या. अंधारून आलेला भवताल दिवाळीच्या निमित्ताने थोडा का होईना उजळून निघाला. रुतून बसलेली चाकं पुन्हा धावायला लागली. चौकटीच्या आत थबकलेली पावलं चालायला लागली. माणसांच्या गर्दीनं गाव, शहरातला किलबिलाट पुन्हा सुरु झाला. ऑनलाईन अभ्यासाने थकलेल्या कोवळ्या डोळ्यांना निदान चार सहा दिवस आराम मिळाला. कष्टाळू हातांना पुन्हा  रोजगार मिळाला किंवा मिळण्याची शक्यता निर्माण झाली. अकल्पित, अविश्वसनीय असं हे सगळं असलं तरी आता या नव्या व्यवहार्य जगण्याचीही आपल्याला सवय लावून घ्यावीच लागणार आहे. दिवाळी किंवा या प्रकारचे विविध सणउत्सव हे आपले प्राचीन सांस्कृतिक वारसे आहेत. कोणताही धर्म असो किंवा प्रदेश असो या वारस्यांना जतन करायलाच हवे. नव्या माध्यमांनी आपल्या जगण्या वागण्याच्या रूढ धारणांना पार बदलून टाकले आहे. नवं काहीतरी आपल्या आयुष्यात खूप वेगाने येऊन आदळत आहे. या नव्यामुळे आपल्या जगण्याची लय आरपार बदलून जाते की काय? अशी भीती सतावत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही दिवाळी खूप वेगळी होती. आपणच आपल्या आयुष्याचं उत्खणन करण्याची आणि स्वतःला सावरण्याची गरज निर्माण झाली होती. अर्थात हे सगळं करायला या काळानेच आपल्याला भाग पाडलं आहे. दोन हजार वीस या वर्षानं माणसाच्या इच्छा आकांक्षाना मोठा तडा दिला आहे. कोरोनाने सगळीच क्षेत्रे प्रभावित झाली आहेत. माणसाच्या दैनंदिनीची सगळी पाने विस्कटून गेली आहेत.  पण तरीही ‘पुनश्च हरिओम’ किंवा ‘मिशन बिगीन अगेन’ म्हणत आपण आपला रस्ता प्रशस्त करू पाहत आहोत. दिवाळी ही एक त्याअर्थानं संधी होती. पूर्ववत होण्याची संधी. आणि आपण ही संधी गमावली नाही. भलेही फटाक्यांचे आवाज जास्त घुमले नसतील, पण  आकाशदिव्यांनी निदान आपले अंगण नक्कीच उजळून निघाले असेल.

या काळाने लोकजीवनावर आणि माणसाच्या समग्र सांस्कृतिक जगण्यावर मोठेच ओरखडे ओढले आहेत. तरीही या ओरखड्याकडे दुर्लक्ष करून नव्या संदर्भाच्या रांगोळीत घरोघरी रंग भरले गेले. दिवे प्रज्वलित झाले. (अर्थात  समाजातला असा एक मोठा  वर्ग आहेच ज्याला घरच नाही. ज्याला अंगण आणि स्थैर्यही नाही. अशा लोकांच्या आयुष्यातही दिवाळीचा सुगंध दरवळायला हवाच.)  ही दिवाळी अनेक अर्थाने महत्त्वाची होती. म्हणजे मागच्या काही दिवसात अनेकांनी आपले जिवलग नातेवाईक, मित्र किंवा परिचितांना गमावले आहे. वियोगाच्या दु:खाचे अवजड ओझे डोक्यावर घेवूनच त्यांनी स्वत:ला सावरले आहे. आप्तस्वकीयांना  विसरता येणार नसलं तरी विसरण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे. त्याशिवाय पुढच्या प्रवास संभवत नाही. म्हणूनच   ‘अविवेकाची काजळी फेडून विवेकाचे दीप उजळण्याची गरज असते.’

दरवर्षीप्रमाणे यावर्षी रंगभूमीवर नवी नाटके आली नाहीत. नवे चित्रपटही प्रदर्शित झाले नाहीत. साहित्य संमेलन किंवा तत्सम सांस्कृतिक व्यवहाराला पहिल्यांदाच वाचक, प्रेक्षक मुकला. अर्थात मनोरंजनाचे नवे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले असले तरी या नव्या गोष्टी खूप परक्या वाटत आहेत. पण हळूहळू याही गोष्टीची सवय होत जाईल. यंदाची आयपीएल स्पर्धा दुबईत प्रेक्षकाविना आणि कोणत्याही जल्लोषाविना पार पडली. हे उदाहरण पुरेशे बोलके आणि सूचक आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अवकाशात दिवाळी अंकांना खूप मोठे स्थान आहे. सुमारे सव्वाशे वर्षाची प्रदीर्घ परंपरा यावर्षी खंडित होते की काय असे वाटत होते. पण सुदैवाने तसे काही घडले नाही. अनेक संपादकांनी नव्या जोमाने, उत्साहाने दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत. तर काहींनी सॉफ्ट  कॉपीचा मार्ग निवडला आहे. तर ते असो.

बाकी या दिवाळीच्या भय आणि उत्साह अशा संमिश्र काळातच अमेरिकेत सत्तांतर घडले. अमेरिका ही जागतिक महासत्ता असल्यामुळे तिथल्या राजकीय घडामोडींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम  संपूर्ण जगावरच होत असतो. त्यामुळे तेथील निवडणुका आणि इतर राजकीय घडामोडींनी मागचे काही दिवस भारतातले माध्यमविश्व व्यापले होते. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या निवडीचा आनंद अनेकांनी भाबडेपणाने साजरा केला. अमेरिकेतील या सत्तांतरामुळे कोणती समीकरणे उदयाला येतात, हे येणारा काळच ठरवील. अर्णब गोस्वामी या पत्रकाराची अटक, बिहारची निवडणूक, आरक्षणाचा मुद्दा अशा असंख्य घटनांची चित्रे आपल्या टीव्हीच्या पडद्यावर सध्या हलत फिरत आहेत. तर सांगायचा मुद्दा हा की, कोरोनाच्या भयातून जग मुक्त होत असल्याचे हे सुचिन्ह आहे. शोषणाच्या, स्थलांतराच्या, बेरोजगारीच्या आणि दुःखाच्या अगणित कहाण्यांना मागे टाकून आपण सगळेच क्रियाशील धावाधाव करत आहोत. ताणतणावाच्या भयकारी रेषा पुसट होत आहेत. चर्चेचे, मनोरंजनाचे प्राधान्यक्रम पुन्हा बदलत आहेत. कोरोना रुग्णाचे आकडे किंवा मृत्यूची चर्चा आता कमी झाली आहे. पण या काळाची बरीवाईट संस्मरणे माणसाला पुढची अनेक वर्ष छळत राहतील.  

जे झाले ते झाले असे म्हणून या गोष्टीपासून सुटका करून घेता येणार नाही. फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याच शब्दात सांगायचे तर आपल्याला निसर्गाचे अध्यात्म स्वीकारावे लागणार आहे. अनेक निकषांचा पुनर्विचार करावा लागणार आहे. निसर्गाशी संवादी झाल्याशिवाय गत्यंतर नाही, हेच या काळाने आपल्याला दाखवून दिले आहे. दिवाळीच्या या पर्वाने हे ‘शहाणपण’ माणसाला मिळावे आणि त्याचे जगणे अधिक अर्थपूर्ण बनावे, हीच अपेक्षा. सर्वांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

शबदांकन- डाॅ.. पी. विठ्ठल, भाषा, वाड्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड P_vitthal@rediffmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com