नांदेड : शाळांसाठी शिक्षण विभागाचे निर्देश, उल्लंघन करणाऱ्या शाळेवर कारवाई

प्रल्हाद कांबळे
Monday, 30 November 2020

जिल्ह्यातील परिस्थितीच्या दृष्टीने शाळा सुरु करताना करावयाचे नियोजन आणि शाळेतील कर्मचाऱ्यांच्या चाचण्या व त्यांचे अहवाल मिळण्यासाठी लागणारा वेळ या बाबी विचारात घेता जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या ता. २३ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या शाळा ता. दोन डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत.

नांदेड : जिल्ह्यात होळीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शाळा सुरक्षितपणे सुरु करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निर्देश जारी केले आहे. यात प्रामुख्याने शाळा परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवावे. शाळेच्या वर्गखोल्या अध्ययन, अध्यापन साहित्य निर्जंतुकीकरण करण्यात यावे. यासह अनेक महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील परिस्थितीच्या दृष्टीने शाळा सुरु करताना करावयाचे नियोजन आणि शाळेतील कर्मचाऱ्यांच्या चाचण्या व त्यांचे अहवाल मिळण्यासाठी लागणारा वेळ या बाबी विचारात घेता जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या ता. २३ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या शाळा ता. दोन डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या शाळा ता. दोन डिसेंबरपासून सुरु करुन इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांना गर्दी टाळण्यासाठी प्रत्यक्ष अध्यापन वर्गात एक दिवसाआड बोलवावे.

हेही वाचा -  हिंगोली : अंगणवाडी केंद्राना होणार कायमस्वरूपी पाणी पुरवठा

मास्कचा वापर करावा

शाळा सुरु करताना शासन परिपत्रकात नमूद केलेल्या सर्व सूचनांचे सर्व स्तरावरुन काटेकोरपणे पालन करण्यात यावे. प्रामुख्याने शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवावा. शाळेतील वर्ग खोल्या व वर्ग खोल्यातील अध्ययन, अध्यापन साहित्य निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शक्य झाल्यास अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात यावेत. शाळेच्या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी शाळेत असेपर्यंत शाळेत कोणतीही कृती करताना मास्कचा वापर करावा.

प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुट्टी नसेल

विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग यांची दररोज साधी आरोग्य तपासणी करावी. तसेच शाळेत यावरील घटका व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला आवारात व शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेश देऊ नये. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांनी शाळेत केलेल्या दिवशी उपस्थित राहावे. तसेच विद्यार्थी व कर्मचारी यांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी परस्परांत कोणत्याही साहित्याची देवाणघेवाण करणार नाहीत याची काळजी घ्यावी. शाळेतील अध्यापन करावयाच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एक दिवसात शाळेत बोलवावे. यासाठी इयत्ता निहाय ऑनलाईन, ऑफलाइन वर्गाचे वेळापत्रक तयार करुन त्यानुसार अंमलबजावणी करावी. प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी तीन ते चार तासांपेक्षा अधिक असणार नाही तसेच प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुट्टी नसेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Education department directives for schools, action against violating schools nanded news