Video : नांदेडमध्ये आहे जुन्या गाण्यांवर व्यक्त होणारा अंगत-पंगत कार्यक्रम  

प्रमोद चौधरी | Thursday, 20 August 2020

चार लोकांसमोर बोलण्याचे दडपन बाळगणारा श्रोता आपल्या आवडीच्या गाण्याबद्दल त्यांच्या आठवणी किंवा आपल्याला हे गाणे का आवडते हे सांगताना स्वतःला विसरतो, हेच अंगत पंगत कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

नांदेड : डाॅ. वृषाली किन्हाळकर यांच्या बंगल्यात गाण्यांची अंगत-पंगत या अभिनव उपक्रमाला सुरुवात मार्च २०१२ मध्ये झाली. आपल्या आवडीच्या जुन्या गाण्याबद्दल आपणच आपल्या भावना, विचार श्रोत्यांसमोर मांडायचे आणि ते मूळ गीत सगळ्यांनी ऐकायचे, असा हा उपक्रम आज नवव्या वर्षात दिमाखाने सुरु आहे.

नांदेडला गाण्यांची अंगत पंगत हा जुन्या गाण्यांच्या आस्वाद कार्यक्रमाचा एक समूह आहे. प्रत्येक शहरात असतो तसाच. पण फरक असा आहे, की इथे आपल्या आवडीच्या गाण्याबद्दलच्या आपल्या भावना, आठवणी मांडायला प्रत्येकाला प्रवेश आहे. जुनी गाणी आपल्या अत्यंत आवडीची, त्या गाण्याबद्दल काही सांगायची मनातली इच्छा या निमित्ताने पूर्ण होते. आता हा उपक्रम नवव्या वर्षात दिमाखाने सुरु असून शंभर ते दिडशे श्रोत्यांपर्यंत कार्यक्रमाला उपस्थिती असते.

हेही वाचा - 

दर महिन्यात गाण्यांचे कार्यक्रम व्हायचे. एखादा विषय जाहीर होतो, त्यावर बोलणारे श्रोते आपापली नावे नोंदवितात. श्रोते निवडलेल्या गाण्याबद्दल बोलतात. गाण्यावर बोलणारी ही मंडळी म्हणजे, सर्वसाधारण श्रोते. वेगवेगळ्या नोकऱ्यातून सेवानिवृत्त झालेले. गाण्यांची अंगत-पंगतमुळे चार लोकांसमोर बोलण्याची सवय नसलेले किंवा मुळात गाण्याबद्दल बोलायची कधी कल्पनाच न केलेले श्रोते बोलायला लागले आहेत.  

कोरोनामुळे मिळाले वेगळे वळण
मार्च महिन्यापासून मासिक कार्यक्रमांचा हा सोहळा थांबला आहे. जुन्या गाण्यांच्या गप्पा-ती गाणी सर्वांसोबत ऐकणे थांबून गेले आहे. या उपक्रमाने पाहता पाहता मनोरंजनाचे एक सुरेख असे वळण घेतले. आता सभोवतालचे वातावरण, ती काळजी, घरात राहून आलेला एकलेपणा, त्यातून येणारी अगनिकता हे सगळं एकदम कमी झालं. त्याचे कारण म्हणजे व्हाट्सअप ग्रुपवर गाण्याबद्दलच्या चर्चेचे सादर केले जाणारे कार्यक्रम. गेल्या तीन महिन्यांपासून रात्री नऊ वाजता नियोजित श्रोत्याने रात्रीच्या मुडशी सुसंगत असे त्याच्या आवडीचे गाणे घेऊन त्यावर स्वतः तीन मिनिटांचे निवेदन रेकाॅर्ड करायचे, ते पोस्ट करायचे आणि संबंधित गाण्याची लिंक शेअर करायची. ग्रुपच्या पावणे दोनशे श्रोत्यांसाठी आपले निवेदन आणि गाणे सादर होते आहे, ही रामांचीत करणारी भावना श्रोते अनुभवत आहेत.

हे देखील वाचाच -  

श्रोते बोलू लागलेत मोकळेपणाने
या कार्यक्रमामध्ये निवेदन रेकाॅर्ड करायचे असल्याने श्रोत्यांचा उत्साह वाढला. दडपन निघून गेले आणि श्रोते अधिक मोकळेपणाने बोलूही लागले आणि अभ्यासाला लागले. निवेदन-गाणे सादर झाल्यावर मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांमुळे एक प्रकारचा हुरूप येतो आहे. गाणी ऐकण्याच्या छंदाला अशा प्रकारे निर्मितीची जोड लागल्याने गाण्यांची अंगत-पंगतचे सदस्य या अवघड कालावधीचा उत्तम उपयोग करून घेत आहे. मधुकर धर्मापूरीकर, माणिक गुमटे, उमेश व्यवहारे यांच्यासोबतच डाॅ. वृषाली किन्हाळकर, डाॅ. सुजाता जोशी पाटोदेकर, रणजीत धर्मापुरीकर, प्रा. सुधीर बारडकर, डाॅ. नंदू मुलमुले यांचाही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग असतो.

महिलांना विशेष लाभ
गाण्यांची अंगत पंगतच्या व्हाटसअप ग्रुपवर पुरुष श्रोतेही सहभागी असतातच. पण विशेष लाभ झाला, तो महिलांना. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने ही अंगत पंगत बहरून आली आले. कोरोनाच्या या मौसममध्ये प्रत्येकीने आपली शैली-आपले व्यक्तिमत्व जोपासले आहे.
- रश्मी कुणाल यंदे, नांदेड.